जवानांनी रोखल्या कचऱ्याच्या गाड्या
By admin | Published: August 18, 2015 03:38 AM2015-08-18T03:38:34+5:302015-08-18T03:38:34+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभाग व देहूरोड लष्करी भागात जमा होणारा कचरा दारूगोळा कोठाराजवळ टाकण्यास स्थानिक लष्कराने मज्जाव केला आहे.
देवराम भेगडे, देहूरोड
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभाग व देहूरोड लष्करी भागात जमा होणारा कचरा दारूगोळा कोठाराजवळ टाकण्यास स्थानिक लष्कराने मज्जाव केला आहे. कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या व इतर वाहने रोखल्याने चार दिवसांपासून घरातला कचरा घरातच ठेवण्याची वेळ आल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने नागरिक हैराण आहेत. सार्वजनिक ठिकाणीही कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. कचरा टाकण्याच्या ठिकाणी (डेपो) योग्य ती उपाययोजना करण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील असून, त्याबाबत लष्करी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला जात असून, लवकरच त्यातून मार्ग निघेल, असे सूत्रांनी सांगितले.
बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभागांत घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी एकूण सहा घंटागाड्या ठेकेदारामार्फत प्रशासनाने नेमल्या असून, देहूरोड लष्करी भागातील वसाहतीत एकूण तीन घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक दोन वगळता सर्व सहा प्रभागांत इतर कचरा गोळा करण्यासाठी पाच ट्रॅक्टर भाड्याने घेतले आहेत. प्रभाग दोनमध्ये व लष्करी भागात विविध ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी बोर्डाच्या दोन कचरा गाड्यामार्फत कचरा नियमित गोळा करण्याचे काम करण्यात येते. जमा होणारा सर्व कचरा बोर्डाच्या निगडी जकात नाक्याजवळील लष्कराच्या मोकळ्या जागेत गेली अनेक वर्षे टाकण्यात येत आहे. कचऱ्याच्या डेपोपासून जवळच लष्कराचे देहूरोड दारुगोळा कोठार असून, कचऱ्याचा त्रास होत असल्याने बोर्डाला एक महिन्यापूर्वी पत्र पाठवून कचरा डेपो सध्याच्या जागेवरून हटविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र निगडीतील परमार कॉम्प्लेक्ससमोरील मोकळ्या मैदानात सर्व कचरा गोळा करण्याबाबत लष्कराने सुचविले असून, सदर जागा नागरी वस्ती, लष्करी अभियंता पाणीपुरवठा केंद्र व महामार्गालगत असल्याने अद्याप त्या ठिकाणी कचरा डेपो हलविण्याचा निर्णय झाला नसल्याचे समजते.
जवानांनी बोर्डाच्या सर्वच कचरा गाड्या कचरा डेपोकडे जाण्यापासून रोखल्या आहेत.(वार्ताहर)