‘प्रेमासाठी वाट्टेल ते’..! पिंपरी-चिंचवड शहरातून नऊ महिन्यांत दोनशेवर मुला-मुलींची ‘धूम’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 02:12 PM2020-10-19T14:12:50+5:302020-10-19T14:13:27+5:30
पिंपरीतील अल्पवयीन मुलांचे ‘उद्योग’
नारायण बडगुजर-
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून यंदा नऊ महिन्यांत अल्पवयीन असलेल्या 219 मुली व मुलांना फूस लावून पळवून नेण्यात आले. यात प्रमाचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आलेले अल्पवयीन दोनशेवर आहेत. यातील 146 मुले व मुली मिळून आल्या आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांना प्रवासी अथवा इतर वाहतुकीस मनाई करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच काही निर्बंधांसह प्रवासाला मुभा देण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत प्रवासावरील निर्बंध कमी करण्यात आले. याचा फायदा घेत काही टवाळखोर किशोरवयीन मुलींना पळवून नेत आहेत. प्रवासाची सुविधा होताच ते धूम ठोकत आहेत. ‘प्रेमासाठी कायपण’, असे म्हणत अल्पवयीन मुली व मुले ‘सैराट’ होत आहेत. यातूनच प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून अल्पवयीनांना पळवून नेल्याचे प्रकार वाढत आहेत. नकळत्या वयात ही अल्पवयीन मुले व मुली घराचा उंबरा ओलांडून गेल्याने पालक हतबल झाले आहेत.
--------------+++-------------
अल्पवयीन मुलांच्या शोधासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक नियमावली व राज्य शासनाने ठरवून दिलेली कार्यप्रणाली यानुसार पोलीस याप्रकरणात तपास करतात. प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यासाठी स्वतंत्र ‘सेल’ आहे. अल्पवयीनांना पळवून नेल्या प्रकरणाचा प्रत्येक गुन्हा गंभीर असतो. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस अशा अल्पवयीनांचा शोध घेतात.
- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड
-------------+-----
किशोरवयीन अवस्थेतील मुली व मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी स्वत:ला अभ्यास किंवा इतर कामांत गुंतवून ठेवावे. छंद जोपासावेत आणि दूरगामी विचार करण्याची तयारी ठेवावी. मित्र व मैत्रिणींइतकाच मोकळा संवाद आपल्या आईवडिलांशी साधावा.
- ॲड. गौरी राऊळ, सदस्य, बालसुधार समिती, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय
-----------+----------
अशा प्रकरणांमध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पळून गेलेली मुले घरी परतल्यानंतर त्यांना समजून घेतले पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र व मैत्रिणींबाबत पालकांना माहिती पाहिजे. घरातील प्रत्येकाने सुसंवाद साधला पाहिजे. मुले एकटी पडणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावा.
- ॲड. संतोष मोरे, सदस्य, बालसुधार समिती, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय
---------------------------+-------
अशा प्रकरणात मुलामुलींनी खूप मोठा गुन्हा केल्याचा समज करून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. या मुलामुलींना योग्य मार्गदर्शनाची व मानसिक आधाराची गरज असते. आईवडिलांसह पोलिसांनी देखील त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- जैद सय्यद, प्रकल्प अधिकारी, रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टीस, पुणे
-----------------++++
जानेवारी ते सप्टेंबर 2020 पळवून नेण्यात आलेले अल्पवयीन
जानेवारी – 63
फेब्रुवारी – 51
मार्च – 28
एप्रिल – 11
मे – 9
जून – 15
जुलै – 14
ऑगस्ट – 22
सप्टेंबर – 32
एकूण – 219
मिळून आलेले अल्पवयीन – 146