संकेतस्थळ अपडेट होणार कधी? देहूरोड कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नक्की कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:03 AM2017-11-29T03:03:45+5:302017-11-29T03:04:20+5:30
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची बहुतांश माहिती चुकीची असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आठ महिन्यांपूर्वी बदली झालेले अध्यक्ष, चार महिन्यांपूर्वी निवडलेले उपाध्यक्ष, तसेच सात
देहूरोड : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची बहुतांश माहिती चुकीची असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आठ महिन्यांपूर्वी बदली झालेले अध्यक्ष, चार महिन्यांपूर्वी निवडलेले उपाध्यक्ष, तसेच सात महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका यांची छायाचित्रांसह नावे अद्यापही संकेतस्थळावर झळकत आहे. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाची व शाळांची माहिती गेल्या दोन वर्षांपासून बदललेली नाही. संकेतस्थळ ‘अपडेट’ होत नसल्याने बोर्डाची माहिती पाहताना नागरिकांचा संभ्रम होत आहे.
देहूरोडसह देशातील ६२ कॅन्टोन्मेंटचा कारभार संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील रक्षा संपदा महासंचालनालयाच्या महानिर्देशकांच्या नियंत्रणाखाली चालत आहे. सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांची माहिती संबंधित (डीजीडीई. जीओव्ही.इन) संकेतस्थळावर नागरिकांना पाहता येते. या संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची माहिती पाहत असताना नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सैफ उल इस्लाम खान यांची मार्चच्या अखेरीला बदली झाली असून, त्यांच्याकडून ब्रिगेडियर ओ़ पी़ वैष्णव यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. वीस एप्रिल २०१७ ला झालेल्या मासिक बैठकीत ब्रिगेडियर वैष्णव यांनी अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ घेतली होती. मात्र, अद्यापही त्यांचे नाव व छायाचित्र रक्षा संपदा विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेले नाही. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी विशाल खंडेलवाल यांची १७ जुलै २०१७ ला निवड झाली असताना अद्यापही खंडेलवाल यांचे छायाचित्र व नाव संकेतस्थळावर दिसत नाही.
कॅन्टोन्मेंटच्या प्राथमिक मराठी शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापिका पुष्पलता मधुकर शिंदे या ३० एप्रिल २०१७ ला सेवानिवृत्त झाल्या आहेत. तरीदेखील आजतागायत शिंदे यांचे नावासह छायाचित्र संबंधित संकेतस्थळावर झळकत आहे. तसेच बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षक आकडेवारी दोन वर्षांत अपडेट केलेली नसल्याचे दिसत आहे.
अनेक चुका : प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
संकेतस्थळावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इतर माहितीतही अनेक चुका आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थापनेची तारीख दिलेली नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एमएससीआयटी हा कोर्स शिकविला जातो, अशी माहिती दिली आहे. हे अद्याप बोर्डाच्या शाळांत सुरू झालेले नाही. संकेतस्थळावर मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांना तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी टी. एम. वाकचौरे यांना बोर्डाकडून देण्यात आलेला मोबाइल क्रमांक बदलण्यात आलेला नाही.
चुकीची माहिती, नावे, छायचित्रे आदींबाबतीत बोर्ड प्रशासनाने संबंधित विभागाला तातडीने त्यांची चूक निदर्शनास आणून द्यावी़ तसेच नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी योग्य माहिती व छायचित्र प्रसिद्ध करणेबाबत कळवावे, अशी मागणी जागरूक नागरिकांतून होत आहे.