पिंपरी : महापालिकेची शहराच्या विविध भागांत रुग्णालये आहेत. मात्र, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वायसीएम रुग्णालयावर अधिक ताण येऊ लागला आहे. कमी मनुष्यबळामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापन कोलमडले आहे. आरोग्य, वैद्यकीय सेवा पुरविणे हे महापालिकेचे अत्यावश्यक काम आहे. परंतु त्याची योग्य प्रकारे पुर्तता होत नाही. तरीही महापालिका प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा घाट घातला आहे.महानगरपालिकेचे साडेसहाशे खाटांच्या क्षमतेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) संत तुकारामनगर येथे आहे. तर भोसरीत १०० खाटांचे आणखी एक रुग्णालय उभारण्यात आले आहे. थेरगाव येथे १०० खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने इमारत उभारण्यात येत आहे. याशिवाय चिंचवडगाव येथे तालेरा रुग्णालय, आकुर्डी येथे महापालिकेचे रुग्णालय आहे. शहरातील गरीब, गरजू नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे महापालिकेची रुग्णालये त्यांच्यासाठी वरदान ठरणारी आहेत. परंतु या रुग्णालयात नव्याने भरती होत नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. त्यामुळे रुग्णसेवेच्या अपेक्षेने जाणाºयांना प्रत्येक ठिकाणी रांगेत थांबावे लागते.तसेच बंधपत्रावर प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपलब्ध झाल्यास महापालिकेला उपयोग होईल, या हेतूने वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याची संकल्पना महापालिका प्रशासनाच्या वतीने पुढे आली आहे. परंतु ज्या उद्देशाने ही संकल्पना पुढे आली, तो उद्देश पूर्ण व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.महापालिकेने उभारलेल्या रुग्णालयाच्या इमारती भविष्यकाळात प्रसिद्ध खासगी हॉस्पिटलला भाडेपट्ट्याने दिल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांचे व्यवस्थापन कमकुवत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यात सुधारणा घडून येणे अपेक्षित आहे. पायाभूत सुविधा, सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध असूनही महापालिकेचे रुग्णालयीन व्यवस्थापन ढासळते. सुसूत्रतेच्या कारभाराचा अभाव हे त्याचे प्रमुख कारण आहे. रुग्णालये सक्षम करून रुग्णसेवेत सुधारणा घडवून आणण्यापेक्षा वैद्यकीय अभ्यासक्रम आणि रुग्णालयाच्या इमारती उभारणीवर भर दिला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.रुग्ण, नातेवाइकांचे हालएक्स-रे, तसेच अन्य तपासण्यांसाठी लांबच लांब रांगा लावून थांबण्याची नागरिकांवर वेळ येते. अनेकदा खाट उपलब्ध नाही, म्हणून रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जातो. रुग्णांचे हाल होतात, तसेच रुग्णालयात काम करणाºया कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. शहरात विविध भागांत रुग्णालये सुरू झाली तर वायसीएमवरील ताण कमी होणे अपेक्षित आहे. मात्र योग्य प्रकारे नियोजन नसल्याने महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये जाण्यापेक्षा नागरिक वायसीएममध्ये जाण्यास प्राधान्य देतात. त्या त्या भागातील रुग्णालयात त्यांना योग्य प्रकारे सुविधा मिळाल्यास वायसीएममध्ये उपचार घेणाºयांचे प्रमाण कमी होईल. वायसीएमवरील ताण कमी होऊ शकेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची गरजकोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेली महापालिकेची रुग्णालये सक्षम करण्याचा प्रयत्न होण्याऐवजी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे. या महाविद्यालयासाठी प्राध्यापक नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी असे महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. त्यामागे त्यांचा उद्देश वेगळा होता. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयास शासनाकडून प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, येथील मनुष्यबळाची कमतरता भरून काढणे शक्य होईल, असा त्यामागील त्यांचा उद्देश होता. शासनाकडून बंधपत्रावर डॉक्टर उपलब्ध झाल्यास महापालिकेचा खर्च कमी होईल.
‘वैद्यकीय’चा घाट; रुग्णांची वाट, आरोग्य विभाग अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव, वायसीएम रुग्णालयावर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 3:14 AM