मावळातील गडकिल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद होण्यासाठी पाठपुरावा करणार : संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 05:43 PM2018-11-25T17:43:23+5:302018-11-25T17:46:20+5:30
मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद व्हावी याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची आश्वासन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसिडर खासदार संभाजीराजे यांनी मावळवासीयांना दिले.
लोणावळा : मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद व्हावी याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची आश्वासन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसिडर खासदार संभाजीराजे यांनी मावळवासीयांना दिले. मावळा भागातील गड किल्ले व लेण्या यांची नोंद युनेस्कोच्या यादीत व्हावी याकरिता संपर्क संस्थेच्या वतीने भाजे लेणी ते लोहगड किल्ला दरम्यान आज आयोजित केलेल्या संपर्क हेरिटेज वाॅकच्या उद्घाटन प्रसंगी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, दाभाडे घरण्याचे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे उपअधिक्षक नेगी, पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापु भेगडे, अभिनेत्री गिरिजा ओक, संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, आयएनएस शिवाजीचे कमांडर श्रीनिवासन, सिअारपीएफचे डीआयजी सचिन गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, भाजे गावचे सरपंच चेतन मानकर, दीपक हुलावळे, शरद हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत या वॉकला सुरुवात करण्यात आली. सर्वच मान्यवरांनी काही अंतर या वाॅकमध्ये सहभाग घेतला. निसर्गाच्या सानिध्यात सकाळी पावणेनऊ वाजता या वाॅकला सुरुवात झाली, याचठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारी तलवारबाजी सुरु होती. शेजारीच काही अंतरावर तुळशी वृदांवनाच्या शेजारी फेर धरुन गाणी म्हणत नृत्य करणार्या महिला, जात्यावर पिठ दळत ओव्या गाणार्या वयस्कर महिला, भजनकरी, वासुदेव, भाजे लेणीच्या पायर्यांवर बसलेले भुक्कु महाराज, काही अंतर डोंगर चढून गेल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी मक्याचे कणीस व वडापावची मेजवानी, विसापुराच्या पायथ्याला पोवाडे गाणारे शाहिर व मल्लखांबाचे नयन मनोहरी खेळ करणारी डीसी हायस्कूल खंडाळ्यातील मुले सोबतच लोहगड, विसापुर, भाजे, बेडसे या पुरातन वास्तुची माहिती देणारी इतिहास अभ्यासक पहायला मिळत होती. निसर्गाचा आनंद घेत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला या वाॅकची सांगता झाली. त्याठिकाणी भरविण्यात आलेले शिवकालिन शस्त्र प्रदर्शन पाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच मनोरंजना करिता महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाॅकमध्ये सहभागी झालेले हजारो नागरिक लोहगडावर गेल्याने किल्ल्याचा परिसर गजबजुन गेला होता. किल्ल्याच्या पायथ्याला पिठलं भाकरी, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत व वरण भात असा मराठमोठा साज भोजना करिता ठेवण्यात आला होता. निसर्गाच्या सानिध्यात हा वाॅक पुर्ण करताना सहभागी झालेल्या नागरिकांना महाराष्ट्राच्या पुरातन संस्कृतीचे दर्शन घडविणे हा यामागील उद्देश असल्याचे अमितकुमार बॅनर्जी यांनी सांगितले.
गड किल्ले संवर्धनासाठी स्वंतत्र मिनिस्ट्री स्थापन करा - संभाजीराजे
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 पेक्षा अधिक गड किल्ल्यांपैकी एकाही किल्ल्यची नोंद आजपर्यत जागतिक वारसा हक्कात नाही हे आपले दुदैव अाहे. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकारण्यांना गड किल्ले संवर्धनाच्या कामात रस नाही. राजस्थान मधील ज्या किल्ल्यांना कोणताही इतिहास नाही त्याठिकाणी कधी लढाई देखिल झाली नाही असे सात किल्ले जागतिक वारसा हक्कात नोंद आहेत पण महाराजांचा एकही किल्ला नाही. महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी वेगळी मिनिस्ट्री स्थापन करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी लोकमतशी बोलताना केली. सरकारं करोडो रुपये हिकडे तिकडे खर्च करतात मंग गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष का असा प्रश्न देखिल त्यांनी यावेळी उपस्थित केला.