पिंपरी : महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अनधिकृत बांधकामाविरूद्धची कारवाई करण्यासाठी पिंपळेगुरव येथे दाखल झाले. त्यांनी इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. त्यावेळी या इमारतीत राहणाऱ्या देवी राम पवार (वय ३०) या महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ही घटना मंगळवारी साडेबाराच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनमुळे पिंपळेगुरव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळेगुरव येथील देवकर पार्क येथे सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी ताफयासह गेले. पोलीस बंदोबस्तात गेलेल्या या पथकाने घरमालकांना घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. देवी पवार तसेच घरातील अन्य मंडळींनी कारवाई थांबविण्याबाबत पथकाला विनंती केली. मात्र त्यांचे काहीही ऐकुन न घेण्याच्या मनस्थितीतील अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारवाई करावीच लागेल. असे सांगून या घरातील साहित्य बाहेर काढण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर देवी पवार पुढे आल्या. अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई होत असल्याने तणावाखाली आलेल्या देवी पवार इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या. तणावाच्या परिस्थितीत त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या देवी यांना वाकड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या महिलेला कोणीतरी ढकलुन दिले, असा तिच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
महिलेची तिसऱ्या मजल्यावरून उडी; पिंपळेगुरवमध्ये अवैध बांधकामाच्या कारवाईदरम्यानचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:38 PM
अतिक्रमण विरोधी पथक अनधिकृत बांधकामाविरूद्धची कारवाई करण्यासाठी पिंपळेगुरव येथे दाखल झाले. त्यांनी इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. त्यावेळी या इमारतीत राहणाऱ्या देवी राम पवार (वय ३०) या महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
ठळक मुद्देगंभीर जखमी झालेल्या या महिलेला तातडीने हलविण्यात आले रूग्णालयात महिलेला कोणीतरी ढकलुन दिले; महिलेच्या नातेवाईकांनी केला आरोप