ग्रामीण भागातील महिला वळल्या पुन्हा पारंपरिक चुलीकडे; गॅस दरवाढीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:48 AM2018-11-27T01:48:07+5:302018-11-27T01:50:57+5:30
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये काहीशी कपात होत आहे. मात्र गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.
- प्रकाश गायकर
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये काहीशी कपात होत आहे. मात्र गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे उद्योगनगरीसह मावळच्या ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये गॅसचा दर ९३४ रुपये झाला आहे. परिणामी गृहिणींच्या दर महिन्याच्या बजेटमध्ये वाढ होत आहे.
एप्रिल महिन्यापासून गॅसच्या दरात तब्बल २८७ रुपयांची घसघसीत वाढ झाल्यामुळे शहरवासीयांना महागाईची झळ बसू लागली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर महिन्याला सिलिंडरचे भाव वाढत असून, नोव्हेंबर महिन्यामध्ये सिलिंडरचा दर ९४० चा आकडा पार करण्याची शक्यता आहे. एवढा महागडा सिलिंडर खरेदी करताना उद्योगनगरीसह मावळ भागातील गृहिणींच्या बचतीला कात्री लागली आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आपुलकी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र रोजच्या भाववाढीने त्याचे योग्य फलीत झाले नसल्याचे दिसून येते. वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनताही मेटाकुटीस आली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला हजार रुपयाच्या आसपास पैसे देऊन गॅस सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्या भागात पुन्हा चुली पेटविल्या जात आहेत. त्यामुळे चूलमुक्त करण्याच्या शासनाच्या धोरणावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात घरामध्ये असलेले गॅस सिलिंडर केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
मावळात पाहुण्यांच्या चहासाठीच गॅस
उज्ज्वला योजनेच्या सुरुवातीला सिलिंडरची किंमत ६०० रुपये होती. त्या वेळी ग्रामीण भागातील नागरिक काही प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करत होते. मात्र आता सिलिंडरचा भाव साडेनवशे रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे केवळ पाहुणा आल्यास चहा करण्यासाठीच गॅसचा वापर केला जात आहे. ज्यांच्याकडे पैसेच नाहीत अशा नागरिकांनी गॅस भरणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये केवळ रिकाम्या गॅसच्या टाक्या दिसत आहेत.
भाववाढीने चाकरमान्यांचे हाल
शहरी भागातील महिलांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही. अनुदानाची रक्कम जास्त प्रमाणात जमा होत असल्याचे सांगितले जात असले तरी ती रक्कम अतिशय थोड्या प्रमाणात जमा होते. गॅस सिलिंडर खरेदी करतेवेळी एवढे पैसे मोजावे लागत असल्यामुळे हातावर पोट असलेल्या चाकरमान्यांची चांगलीच गोची होत आहे. सिलिंडरची भाववाढ अशीच सुरू राहिल्यास शहरातील कुटुंबांनाही पुन्हा चुलीकडेच वळण्याची वेळ आली आहे.