पिंपरी : महसूल विभागाच्या सक्षम महिला अधिकारी म्हणून पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी कोरोना काळात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पूरग्रस्तांना त्यांनी मदत मिळवून दिली.
मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील असलेल्या गीता गायकवाड यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी पुणे विद्यापीठातून प्राप्त केली आहे. वडील श्रीधर सावंत सैन्यात होते. त्यामुळे शिस्तीचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे तहसीलदार म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी जिल्ह्यातील पहिले इ- कामकाज असलेले कार्यालय केले. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान झाला. तसेच हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात आला. २०१३ ते २०१८ दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन विभागात सक्षम प्राधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी १०० योजनांचे काम मार्गी लावले.
पिंपरी-चिंचवड तहसीलदार म्हणून २०१९ मध्ये जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. त्यात ४८०० लोकांना आठ कोटींची मदत उपलब्ध करून दिली. तसेच कोरोना काळात २२००० हून अधिक लोकांना धान्य वाटप तसेच ५५०० लोकांना जेवणाची व्यवस्था केली. त्यासाठी कम्युनिटी किचन उभारले. कोरोना काळात विविध दाखले वितरित करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध करून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना ६३४७१ अर्ज वितरित केले.
दरम्यान, २००३ पासून नायब तहसीलदार ते तहसीलदार म्हणून जबाबदारी पार पाडताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम केले. त्याची दखल घेत अतिउत्कृष्ट मूल्यांकन झाले. प्रत्येक महिलेला स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. तसेच कर्तव्यभान राखले पाहिजे. महिलांना समजून घ्यावे. त्यामुळे त्यांना आणखी चांगले कतृत्व करता येईल.- गीता गायकवाड, तहसीलदार, पिंपरी- चिंचवड