पटना : बिहारची निवडणूक होऊन महिना लोटत नाही तोच राज्य सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाने अरुणाचलमध्ये नितीशकुमारांच्या जदयूचे सहा आमदार फोडल्याने नाराज असलेल्या नितीशकुमारांनी दोन दिवसांतच पक्षाचा अध्यक्ष बदलून भाजप आघाडीच्या जबाबदारीतून हात काढून घेतले आहेत. यातच मंगळवारी ''तेजस्वी सीएम, नितीश पीएम''ची ऑफर आली होती. यानंतर आज नितीशकुमारांची साथ सोडलेल्या राजदच्या नेत्याने जदयूचे 17 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचे सहा आमदार भाजपाने फोडल्याने नितीशकुमार नाराज झाले आहेत. यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आईच्या मृत्यूनंतरही त्यांची घरी जाऊन भेट घेणे टाळले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाच्या बैठकीत नितीशकुमारांनी त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. नितीश कुमार यांचे वारसदार हे त्यांच्याच पक्षाचे दिल्लीत बसणारे राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह आहेत. पटनामध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु होती. तेव्हा अचानक नितीशकुमारांनी आरपीसी यांच्या नावाची घोषणा केल्याने बैठकीतही सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नितीशकुमार य़ांनी आरपीसी यांना जदयूचा नवा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व सदस्यांनी होकार दिला.
यानंतर लगेचच आरपीसी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाने जे केले ते आघाडीधर्माला साजेसे केले नसल्याचे वक्तव्य केले होते. यानंतरच्या घडामोडींनी नितीशकुमार भाजपाशी फारकत घेणार असल्याचे चर्चिले जात आहे. यातच राजदने शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि राजदमध्ये प्रवेश केलेले नेते श्याम रजक यांनी 17 आमदार राजदच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे आमदार भाजपाच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज आहेत, असेही ते म्हणाले. यावर नितीशकुमार यांची लगेचच प्रतिक्रिया आली असून हा पोकळ दावा असल्याचे ते म्हणाले.
किती आमदार हवेत?पक्षांतर बंदी कायद्यानुसार जदयूचे 25 ते 26 आमदार राजदला फोडावे लागणार आहेत. यामुळे रजत यांनी आणखी काही आमदार येत्या काळात राजदमध्ये येतील असा गौप्यस्फोट केला आहे.