मुंबई – राज्यात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही अशा विविध तक्रारी समोर येत आहेत. यात आता ठाकरे सरकारनं वृत्तपत्रात दिलेल्या एका जाहिरातीमुळे विरोधी पक्ष भाजपानं महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली आहे.
ठाकरे सरकारनं मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर काढले आहे. याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने ९०० कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना अशा शब्दात त्यांनी रोहित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गेल्या ३ वर्षापासून मनोरा आमदार निवास बंद
दक्षिण मुंबईत विधान भवन परिसरात मनोरा आमदार निवास आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी मनोरा आमदार निवास बांधण्यात आले होते. २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनोरा आमदार निवासाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. या पाहणीतही इमारती केव्हाही धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळल्याची माहिती समोर आली होती. सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील खोली क्रमांक ११२ मध्ये राहत होते. अँटी चेंबरमधील पीओपीसहित छत कोसळल्याची माहिती समोर आली होती. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालं नव्हतं.
नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवासाच्या चार इमारती १९९६ साली बांधून पूर्ण झाल्या. अवघ्या २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम खराब झाले. सदनिकांमधील छताचे प्लॅस्टर कोसळत असून काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले गेले होते. अनेक वर्षे सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडूनही तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानंतर १ फेब्रुवारी २०१८ पासून आमदार निवास पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आले.