...अन् मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसताना दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा
By प्रविण मरगळे | Published: January 11, 2021 08:58 AM2021-01-11T08:58:30+5:302021-01-11T09:00:52+5:30
Bihar CM Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत.
पटणा – बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारची स्थापना होऊन २ महिने उलटले तरी आतापर्यंत कॅबिनेटचा विस्तार आणि विधान परिषदेच्या जागेचा फॉर्म्युलाही ठरला नाही. यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीत माझा मित्र कोण अन् शत्रू कोण? हे माहिती नव्हतं असं विधान केलं. त्याच एनडीएचे सहकारी जीतनराम मांझी यांनी आपलं राजकीय रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उभा राहतो.
मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा वेळ येते तेव्हा बोलण्याची संधी सोडत नाहीत. मला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती परंतु दबावामुळे मी जबाबदारी स्वीकारली आहे असं पुन्हा नितीश कुमार म्हणाले. जेडीयू प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, निवडणुकीत माझे लोक कमी जिंकले तेव्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. पण मुख्यमंत्री जेडीयू आणि भाजपामुळे झालो आहे. एनडीएमध्ये ५ महिन्यापूर्वी सर्वकाही चर्चा व्हायला हवी होती. कोरोनामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. ज्याचा फटका जेडीयूला बसला.
बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा कमी आल्या. भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या. एनडीएत भाजपाची मोठ्या भावाची भूमिका नितीश कुमारांना पटली नाही. यामुळेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्र कोण आणि शत्रू कोण असं विधान केले. माजी मंत्री जेडीयू नेता जयकुमार सिंह यावेळी भाजपातून एलजेपीत आलेले उमेदवार राजेंद्र सिंह यांच्यामुळे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
नितीश कुमार यांच्या निकटचे मानले जाणारे अभय कुशवाहा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात मुरब्बी असलेले नितीश कुमार यांच्याकडून कुठे चूक झाली आणि त्यांचे राजकीय गणित बदलून गेले. परंतु नितीश कुमार आता पुन्हा पक्षाच्या वाढीसाठी कामाला लागले आहेत. बिहारमध्ये जनतेने यंदा असा जनादेश दिला आहे की, एनडीए आणि महाआघाडी यांच्यात बहुमतासाठी खूपच कमी अंतर आहे. एनडीएकडे १२५ तर महाआघाडीकडे ११० आमदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एमआयएम ५, बसपा १ आणि अपक्ष आमदार आहे. त्यामुळे बिहारमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. जेडीयूचे १७ आमदार आरजेडीमध्ये सहभागी होतील असा दावा केला जात आहे. तर काँग्रेसचेही ११ आमदार एनडीएत जाऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.