मुंबई : माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचे कान टोचताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारांचे निवासस्थान असलेले ‘सिल्व्हर ओक’ गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात पक्षाशी विसंगत भूमिका घेतली आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तर ‘जय श्रीराम’ म्हणत राम मंदिराच्या समर्थनार्थ त्यांनी नुकतेच खुले पत्र लिहिले आहे. पार्थ यांच्या या भूमिकेबद्दल पत्रकारांनी विचारले असता ‘पार्थ अपरिपक्वआहे. त्याचा अनुभव तोकडा आहे. त्याच्या बोलण्याला मी काडीची किमंत देत नाही’ अशा शब्दांत खा. पवार यांनी फटकारले.शरद पवार यांचे हे वक्तव्य वृत्त वाहिन्यांवर झळकताच मंत्रिमंडळाची बैठक सोडून अजित पवार यांनी थेट शरद पवारांचे निवासस्थान गाठले. त्यानंतर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तेथे पोहोचले. त्यामुळे चर्चा सुरू झाली. मात्र, ही बैठक पूर्वनियोजित होती, असे सांगत पवार कुटुंबीयात कसलाही वाद नसल्याचा खुलासा जंयत पाटील यांनी केला. पाटील म्हणाले, पार्थ पवारांबाबत कसलीही चर्चा झाली नाही. पार्थने काही मते मांडली असतील तर ती मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अजितदादांनी मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावर सोडली नाही. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन ते बाहेर पडले. सुशांतप्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे त्यावर पुन्हा वेगळे काही सांगण्याची गरज नाही, असे सांगत पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारले असता, हा पवार कुटुंबातील वाद आहे, त्यावर आपण बोलणे योग्य नसल्याचे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिक भाष्य करणे टाळले.अजित पवारांचे सूचक मौनपार्थने केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर राम मंदिराच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्रावर आजोबांनी पार्थची कान टोचले, मात्र वडील अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. अजितदादांचे हे मौन सूचक असल्याचे अर्थ काढले जात आहे.मुंबई पोलिसांवर विश्वास; पण सीबीआयला हरकत नाही : पवारसुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला करायचा असेल तर आपली त्याला हरकत नाही. मात्र मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. सुशांत चांगला अभिनेता होता. त्याची आत्महत्या वेदनादायी आहे, पण माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची मीडियाने दखल घेतली नाही, असा टोलाही त्यांनी मीडियाला लगावला.
शरद पवारांनी नातवाचे कान टोचले; अजित पवारांनी ‘सिल्व्हर ओक’ गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 5:36 AM