Punjab Politics:पंजाबमधील अमरिंदर सरकार संकटात? काँग्रेस आमदाराचे सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:44 PM2021-05-23T18:44:40+5:302021-05-23T18:48:28+5:30
Punjab Politics: जाब काँग्रेसमधीव वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. दोन दिवसांच्या शांततेनंतर अमरगढचे आमदार सुरजीत सिंग धीमान (Surjit singh dhiman) यांनी शनिवारी पुन्हा एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
Punjab Politics: मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता काँग्रेसच्या ताब्यातील पंजाब (Punjab) राज्यातील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. पंजाबकाँग्रेसमधील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. दोन दिवसांच्या शांततेनंतर अमरगढचे आमदार सुरजीत सिंग धीमान (Surjit singh dhiman) यांनी शनिवारी पुन्हा एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस आमदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पक्षाचे नेतृत्व सिद्धू यांच्यासारख्या कोणीतरी व्यक्तीने करावे अशी मागणी केली आहे. (Surjit singh dhiman appeal to Congress mla about resignation.)
जर आम्ही राज्याच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसू तर खुर्च्यांना चिकटून राहण्यात काहीच फायदा नाही. काँग्रेस आमदारांनी आतील आवाज ओळखावा आणि सामुहिक राजीनामा द्यावा, असे आवाहन करत असल्याचे धीमान यांनी सांगितले.
मी आणि माझे सहकारी नाथू राम या मुद्द्यावर सहमत आहोत. आम्ही राजीनामा देणार आहोत. आम्हाला फक्त दुसरा कोणीतरी नेतृत्व करावे असे वाटत आहे. ते नवज्योत सिंग सिद्धू देखील असू शकतात. चला काहीतरी करूया. आम्ही कोणतातरी नेता नेतृत्वासाठी उभा ठाकतो का, याची वाट पाहत होतो. उच्च न्यायालयाने जेव्हा एसआयटीचा अहवाल रद्द केला तेव्हाच मला राजीनामा द्यायचा होता असे धीमान म्हणाले.
राज्यात ड्रग्ज आताही एक मोठा मुद्दा आहे, यामुळे सरकारविरोधात नाराजी जंगलातील आगीसारखी पसरू लागली आहे. आता हे थांबणार नाही. या परिस्थितीत आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही. नवज्योत सिंग सिद्धू आशेचा किरण आहेत. त्यांनी जर पक्षाचे नेतृत्व केले तर कदाचित पुन्हा सरकार येऊ शकेल, हे मी नाही तर राज्य़ातील लोकांचे मत असल्याचे ते म्हणाले.