त्यांच्या बुद्धीप्रमाणे बोललेत; एकनाथ खडसेंच्या 'त्या' विधानावर अमृता फडणवीसांचा टोला

By कुणाल गवाणकर | Published: November 9, 2020 07:20 PM2020-11-09T19:20:45+5:302020-11-09T19:25:32+5:30

एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेल्या विधानावरून अमृता यांचा चिमटा

amruta fadnavis takes dig at ncp leader eknath khadse over his statement about devendra fadnavis | त्यांच्या बुद्धीप्रमाणे बोललेत; एकनाथ खडसेंच्या 'त्या' विधानावर अमृता फडणवीसांचा टोला

त्यांच्या बुद्धीप्रमाणे बोललेत; एकनाथ खडसेंच्या 'त्या' विधानावर अमृता फडणवीसांचा टोला

Next

मुंबई: मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केलं असं विधान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे. मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. ते जेव्हा माझ्याबद्दल बोलले होते, त्यावेळी मी उत्तर दिलं होतं. आता त्यांच्याबद्दल काही खास बोलू शकत नाही. सगळ्यांना आपली आपली बुद्धी असते त्याप्रमाणे ते बोलले आहेत, अशा शब्दांत अमृता यांनी खडसेंना टोला लगावला. 

'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. त्यावेळी लोकमतशी बोलताना फडणवीस यांनी खडसेंनी केलेल्या विधानावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

... तर मी ब्राह्मण समाजातील बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो, खडसेंचा यु टर्न

६ नोव्हेंबरला एका सभेत बोलताना एकनाथ खडसेंनीदेवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य केलं होतं. 'नाथाभाऊ, तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केलं,' असं खडसे म्हणाले होते. त्यावर अमृता यांनी भाष्य केलं.

"तेव्हा मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रिपद दान केलं," एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

'धर्म, जात यापेक्षा मेरिट महत्त्वाची असते. धर्म, जातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीवर विश्वास ठेवायला हवा. त्यांना (खडसेंना) वाटतंय ते बोलले. माझ्यावर बोलले होते, तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं. सगळ्यांची आपली आपली बुद्धी असते, त्याप्रमाणे ते बोलले आहेत,' असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

खडसेंच्या विधानानंतर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असंही दवेंनी म्हटलं आहे. त्याचसोबतच दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, हे एकनाथ खडसेंना ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटतं, एकनाथ खडसेंनी आपलं विधान मागे घ्यावं नाहीतर पुण्यात आल्यानंतर खडसेंना जाब विचारण्यात येईल. 

खडसेंकडून दिलगिरी व्यक्त
ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर एकनाथ खडसेंनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली. ''दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'', असे खडसेंनी म्हटलंय.

Web Title: amruta fadnavis takes dig at ncp leader eknath khadse over his statement about devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.