...अन् थेट पंतप्रधान मोदींनीच 'मातोश्री'वर फोन लावला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 10:31 AM2018-08-10T10:31:19+5:302018-08-10T11:43:45+5:30
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिल्याचे निमित्त
मुंबई : शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असला, नरेंद्र-देवेंद्र सरकारवर ते रोज टीकेचे बाण सोडत असले, दमलेल्या सावजाची शिकार करण्याची भाषा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असली, तरी भाजपाकडून आपल्या या जुन्या मित्राची नाराजी दूर करण्याचे, त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पुन्हा समोर आलंय. यावेळी तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच 'मातोश्री'वर फोन करून उद्धव यांचे आभार मानल्याचं कळतं. राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी उद्धव ठाकरेंना धन्यवाद दिलेत.
राज्यसभा उपाध्यक्षपदाची काल, गुरुवारी निवडणूक झाली. यामध्ये भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवाराला 125 मते मिळाली होती. एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेही पाठिंबा दिला होता. राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी हरिवंश सिंह यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गेल्या महिन्यात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावेळी शिवसेना गैरहजर राहिली होती. शिवसेनेच्या या दोन्ही भुमिका विसंगत असल्याने राजकीय विष्लेशकही बुचकळ्यात पडले आहेत.
केंद्र सरकारमध्ये भाजपचा सर्वांत जुना आणि मोठा सहकारी असूनही पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळात शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यावरून नाराज असलेल्या शिवसेनेने भाजपला वेळोवेळी लक्ष्य केले होते. यातच विधानसभा निवडणुकीवेळी झालेला विश्वासघातही राज्यात शिवसेनेला स्वस्थ बसू देत नाही. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला वेळोवेळी खिंडीत पकडण्याचा प्रयत्न गेल्या 4 वर्षांपासून सुरु आहेत. असे असले तरीही शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न भाजच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून होत आहेत. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात देशातील सर्वच घटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शिवसेनेसारखा मित्रपक्ष गमावणे भाजपला परवडणारे नाही. यामुळेदोन महिन्यांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियानावेळी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी यापुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर काल झालेल्या राज्यसभा उपसभापती निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. यानुसार राज्यसभेमध्ये काल शिवसेनेने हरिवंश सिंह यांना पाठिंबा दिला होता. या मदतीचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मातोश्रीवर फोन केला.