Anil Deshmukh : त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख बोलले, आरोपांबाबत असे स्पष्टीकरण दिले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:55 PM2021-03-22T14:55:50+5:302021-03-22T14:57:10+5:30
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत.
मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनिल देशमुख यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अनिल देशमुख हे कोरोनामुळे ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते, तसेच १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होते, असा दावा पवार यांनी केला होता. मात्र पवारांचा हा दावा खोडून काढताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक व्हिडीओ शेअर करत १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर आता खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Maharashtra Home Minister Anil Deshmukh spoke about that press conference, gave such explanation about the allegations)
त्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या आरोपांना उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, कोरोनाचे निदान झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला. मी रुग्णालयातून बाहेर पडत असताना तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. मात्र मला कोविडमुळे थकवा आला होता. माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 22, 2021
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तसेच यावेळी शरद पवार यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचा दावा फेटाळून लावत परमबीर सिंह यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्या काळात भेट झाली असा दावा करण्यात आलाय तेव्हा अनिल देशमुख हे कोरोनामुळे आधी रुग्णालयात आणि नंतर होम क्वारेंटाइन होते, असे शरद पवार म्हणाले होते. मात्र शरद पवार यांचा हा दावा देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या १५ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करत खोडून काढला होता