मुंबई : राज्यपालांना मुख्यमंत्री कार्यालयाने विमान प्रवासाची परवानगी नाकारल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावरून भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवले आहे. आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, अशा शब्दांत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (BJP leader Ashish Shelar on Thursday criticised the Maharashtra Vikas Aghadi government led by Uddhav Thackeray for Maharashtra Governor Refused State Plane)
योग्य परवानगी घेऊन राज्यपाल राज भवनावरुन ठरलेल्या प्रवासाला विमानतळावर गेले. विमानतळावर विमानात गेल्यानंतर त्यांना उतरवलं गेले. आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलेय, आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, असे आशिष शेलार म्हणाले. याचबरोबर, राज्यपाल हे संविधानिक या राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्याशी हे सरकार असे वागत असेल तर अन्य लोकं कशी व्यवस्था ठेवणार? राज्यभर अव्यवस्था निर्माण करायची. कुठलीही व्यवस्था योग्य रीतीने चालू द्यायचीच नाही, अशा पद्धतीचा कारभार पहिल्या दिवसापासून हे महाराष्ट्र विकास आघाडीचे ठाकरे सरकार करते आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
आम्ही वारंवार पाहिले आहे, केंद्र सरकारने मंजूर केले कायदे आम्हाला नको. अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्व प्रकल्प आम्हाला नकोत. अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विधान सभेने घेतलेल्या निर्णयाला आम्ही तिलांजली देऊ. केंद्र सरकारच्या चौकशीच्या एजन्सीना महाराष्ट्रातील केसेस आम्ही देणार नाही. चौकशीच्या केंद्राच्या रचना योजनांच्या एजन्सिज यांना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आदेश आम्हाला पाळायचे नाहीत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
राज्य सरकारने माफी मागावी – मुनगंटीवारराज्यपालांना विमानातून उतरवण्यात आले, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकेच नाही तर राज्यपालांची राज्य सरकारने माफी मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारकडून असे घडले असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडले असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.