ठाकरे आणि मोदी यांच्यातील वैयक्तिक भेटीवर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 07:26 PM2021-06-08T19:26:31+5:302021-06-08T19:27:07+5:30
दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.
दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड तास बैठक झाली. पण यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही वैयक्तिक भेट झाल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक भेट झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं ते म्हणाले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे", असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाबाबत माहिती देताना अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांकडे आवश्यक घटनादुरूस्ती करुन सकारात्मक पावलं उचलावीत अशी विनंती केल्याचं सांगितलं. फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
फडणवीसांवर साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीच्या मुद्द्यावरुन अशोक चव्हाण यांनी राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत. विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भाजपला दिलं आहे. "पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच ही भेट राजकीय तडजोडीसाठी नव्हती. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं. त्यांना उलट आनंद वाटला पाहिजे", असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.