त्रिपुरात मस्जिद पाडल्यानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटले, यापेक्षा मला संजय राऊतांचे वक्तव्य ऐकून खूप कीव येत आहे. राजकारणासाठी किती लाचार झालेत, हे दिसतेय. आज स्व बाळासाहेब जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊतांना फटकारले आहे.
तुम्ही राज्य करा, मुस्लिमांची मत मिळवा कोण नाही म्हणतंय असा सवाल करताना देशातील 95 टक्के मुस्लिम प्रमाणिक आहेत, तर 5 टक्के मुस्लिमच गडबड करतात. मालेगावमध्ये, नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याच्या प्रकारावर शिवसेनेने पूर्वी सारखी टीका करावी, मुस्लिम मतांची काळजी करू नका, 5 टक्के मुस्लिम गडबड करतो, त्यावर तुम्ही टीका पण नाही का करणार? असा सवाल पाटलांनी उपस्थित केला आहे.
तुम्हाला झोपताना, उठताना भाजपा दिसतो. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला, आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर आम्हीच फोडला, शेतकरी पैसे आम्ही थांबवले, काय चेष्टा चालली आहे, सामान्य माणसाला कळत नाही काय ? सगळीकडे भाजपचा हात आहे असं म्हणता, मग तुम्ही 3 पक्ष समर्थ आहात ना? भाजपचा हात कापून काढा ना तुम्हाला कोणी अडवलं, असे आव्हानही त्यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.
एक जेलमध्ये दुसरा हॉस्पिटलमध्ये...सरकारने दंगली थांबवण्याचा प्रयत्न केला तर खुर्च्या जातील ही भीती वाटत आहे. मग तुम्ही तिघे दुबळे आम्ही सक्षम आहोत. माजी गृहमंत्री जेलमध्ये, एक गृहमंत्री आता आजारपणातून बाहेर पडले, मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत, पण बाहेरून सरकार चालवणारे मात्र आहेत ना? त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत ही परंपराच आहे. शांततेने करा ना. अमरावतीचा कालचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्री जगदीश गुप्तांचे ऑफिस फोडले गेले नाही का?सामान्य माणसाचे ऑफिस फोडले गेले नाही का? असा सवालही पाटलांनी केला.
आज लाठ्या चालवतील...आजच्या भाजप बंदवर पोलीस लाठ्या चालवतील. काल ज्यांनी दुकान फोडले त्यांच्यावर लाठ्या नाही चालवल्या. 2014 वर बोलावं, 1947 वर बोलण्याचा अधिकार नाही. कंगनाला देखील नाही. संजय राऊत यांनी राज्यसरकारने डिझेल, पेट्रोलचा वॅट कमी करावा यासाठी आंदोलन करावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी राऊतांच्या औरंगबादच्या आंदोलनावर दिली आहे.