Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेसाठी अखेर एनडीएचे जागावाटप ठरले, नितीश कुमारांनी केली अधिकृत घोषणा
By बाळकृष्ण परब | Published: October 6, 2020 06:09 PM2020-10-06T18:09:12+5:302020-10-06T18:13:37+5:30
Bihar Assembly Election 2020: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे.
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसासाठी बऱ्याच खेचाखेचीनंतर अखेर सत्ताधारी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. तर काही दिवसांपर्यंत एनडीएचा घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.
या घोषणेनुसार बिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा आल्या आहेत. त्यापैकी जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल, तर जेडीयू ११५ जागांवर निवडणूक लढवेल. भाजपा आपल्या वाट्याला आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल.
JD(U) has been allotted 122 seats. Under that quota, we are giving 7 seats to HAM. BJP has 121 seats. Talks are underway, BJP will allot seats to Vikassheel Insaan Party under their quota: Bihar Chief Minister Nitish Kumar #BiharElectionspic.twitter.com/DVj1oq7Uhu
— ANI (@ANI) October 6, 2020
यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी सांगितले की, नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढवणार आहे आणि विजयी होऊन सरकार बनवणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका घेण्याची गरज नाही. यापूर्वी सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी बिहार कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्य प्रभारी भूपेंद्र सिंह यादव उपस्थित होते.
२८ ऑक्टोबरपासून तीन टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएचा सामना महाआघाडीशी होणार आहे. महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, सीपीआय (माले), सीपीआय आणि सीपीएम या पक्षांचा समावेश आहे. तर एनडीएचा घटकपक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे १४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र लोकजनशक्ती पक्ष भाजपाविरोधात उमेदवार उतरवणार नाही.
यापूर्वी भाजपा आणि जेडीयूने २०१० मध्ये विधानसभा निवडणूक एकत्रितरीत्या लढवली होती. त्यावेळी जेडीयूने १४१ आणि भाजपाने १०२ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी जेडीयूचे ११५ आणि भाजपाचे ९१ उमेदवार विजयी झाले होते.