Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार LJPबाबत पहिल्यांदाच बोलले, चिराग पासवानांना खूप सुनावले, म्हणाले...
By बाळकृष्ण परब | Published: October 6, 2020 07:05 PM2020-10-06T19:05:59+5:302020-10-06T19:12:52+5:30
एनडीएच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा करतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लोकजनशक्ती पार्टीची भूमिका आणि चिराग पासवान यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
पाटणा - एनडीएचा घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने केलेली बंडखोरी आणि जागावाटपाबाबत सुरू असलेल्या तिढ्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी लांबलेले एनडीएचे जागावाटप अखेर आज जाहीर झाले. दरम्यान, जागावाटपाची अधिकृत घोषणा करतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लोकजनशक्ती पार्टीची भूमिका आणि चिराग पासवान यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
जागावाटपाची घोषणा केल्यानंतर चिराग पासवान यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता नितीश कुमार यांनी रोखठोक उत्तर दिले. ते म्हणाले की, रामविलास पासवान हे सध्या आजारी आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, ही आमची प्रार्थना आहे. मात्र रामविलास पासवान हे आमच्या मदतीशिवाय राज्यसभेवर निवडून गेले होते का? बिहार विधानसभेमध्ये लोकजनशक्ती पार्टीच्या किती जागा होत्या तर केवळ दोन. भाजपा आणि जेडीयूने त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. आमच्या मदतीशिवाय पासवान हे राज्यसभेत पोहोचले आहेत का, असा सवाल नितीश कुमार यांनी विचारला. किती मोठ्या प्रमाणात हत्या होत होत्या. सामूहिक नरसंहारासारख्या घटना होत होत्या. किती दंगे व्हायचे, हे सर्वांना माहिती आहे, असा टोला नितीश कुमार यांनी लगावला.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची अधिकृत घोषणा केली आहे. तर काही दिवसांपर्यंत एनडीएचा घटक पक्ष असलेला लोकजनशक्ती पक्ष मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.
या घोषणेनुसार बिहार विधानसभा निडणुकीत जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा आल्या आहेत. त्यापैकी जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल, तर जेडीयू ११५ जागांवर निवडणूक लढवेल. भाजपा आपल्या वाटल्या आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल.
यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी सांगितले की, नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढवणार आहे आणि विजयी होऊन सरकार बनवणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका घेण्याची गरज नाही.