Bihar Assembly Election Results: "राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते बुडाले"
By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 02:28 PM2020-11-10T14:28:04+5:302020-11-10T14:31:58+5:30
Bihar Assembly Election Results: भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून टोला
पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर सकाळी सुसाट सुटलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची आता पिछेहाट होताना पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सध्याचे आकडे सांगत आहेत. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे.
मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?
सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजद आणि काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली होती. त्यावेळचे कल पाहता राज्यात सत्तातंर होईल असं दिसत होतं. मात्र त्यानंतर भाजप आणि जेडीयूनं आघाडी घेतली. सध्याच्या घडीला एनडीए १३० जागांवर पुढे आहे. तर महागठबंधननं शंभरी गाठली आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी महागठबंधनला टोला लगावला आहे.
भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?
'राहुल यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत. डाव्यासोबत पश्चिम बंगाल मध्ये गेले डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हरले. तेजस्वी यादव यांच्यासोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव', असा टोला उपाध्येंनी लगावला आहे.
बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे
@RahulGandhi यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. @yadavakhilesh सोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत. डाव्यासोबत पश्चिम बंगाल मध्ये गेले डावे सपाटून @MamataOfficial समोर हारले. आणि आता @yadavtejashwi सोबत @INCIndia गेले आणि तिथेही आता पराभव
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 10, 2020
सध्याच्या घडीला बिहारमध्ये एनडीएनं आघाडी घेतली आहे. एनडीए १२७ जागांवर पुढे आहे. भाजपचे ७३ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर जेडीयू ४७ विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. राष्ट्रीय जनता दलानं ६८, तर काँग्रेसनं १९ जागांवर आघाडी घेतली आहे. राजद, काँग्रेस आणि जेडीयूच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी होताना दिसत आहेत. याचा थेट फायदा भाजपला झाला आहे. भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.