नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बिहारच्या जनतेनं जंगलराजला नाकारून विकासाला, सुशासनाच्या बाजूनं कौल दिल्याचं मोदी म्हणाले. कोरोना संकट काळातही मतदार बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचं मोदींनी म्हटलं. निवडणुकीसाठी मतदान पार पडलं की पूर्वी हिंसाचाराच्या, मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या, मतपेटी पळवून नेल्याच्या बातम्या यायच्या. मात्र आता शांततेत मतदान झाल्याच्या, मतदान वाढल्याच्या बातम्या येतात. ही बाब अतिशय सकारात्मक असल्याचं मोदी म्हणाले. याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. बिहारच्या जनतेनं विकासाला प्राधान्य देत एनडीएच्या बाजूनं अतिशय स्पष्ट कौल दिल्याचं ते पुढे म्हणाले. कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभारबिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष संयुक्त जनता दलापेक्षा (जेडीयू) जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद भाजपला मिळायला हवं, अशी विधानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली. त्यावर मोदींनी थेट आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केलं. 'आत्मनिर्भर बिहारचा संकल्प आपण केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आपण त्यात अजिबात कमी पडणार नाही. भाजप, एनडीएचे कार्यकर्ते पूर्णपणे सरकारच्या पाठिशी उभे राहतील,' असं मोदींनी म्हटलं.भाजपचे सायलेंट व्होटर पक्षाच्या पाठिशीबिहार निवडणुकीत महागठबंधन बाजी मारेल, असे अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले होते. मात्र सर्व अंदाज चुकवत बिहारमध्ये एनडीएनं बाजी मारली. त्यातही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. त्यामागचं रहस्यदेखील मोदींनी सांगितलं. 'बिहारच्या निवडणुकीनंतर सायलेंट व्होटरची चर्चा सुरू आहे. भाजपकडे एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग सायलेंट व्होटर आहे. तो वर्ग भाजपला हक्कानं मतदान करतो,' असं मोदी म्हणाले.
महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर असल्याचं मोदींनी सांगितलं. 'भाजप सरकारमध्ये महिलांना सन्मान मिळाला, सुरक्षा मिळाली. जनधनच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम गेली. उज्ज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलेंडरमुळे त्याच्या स्वयंपाकघरातला धूर दूर झाला. शौचालयांची बांधणी, वीज पुरवठा, १ रुपयात सॅनिटरी पॅड यामुळे महिलांना मोठा फायदा झाला. याच महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर आहेत. महिलांचा आशीर्वाद कायम भाजपला मिळतो. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं मोदी म्हणाले.