नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सध्या राज्यात संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. जेडीयू आणि भाजपसमोर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं आव्हान आहे. या निवडणुकीत राज्यात सत्तांतर होईल, असे अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले आहेत. मात्र याआधी अनेकदा एक्झिट पोल्सचे अंदाज चुकल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती आली.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं दणदणीत विजय मिळवला. भाजपनं तब्बल २८२ जागा जिंकत जादुई आकडा पार केला. तर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ३३६ जागा मिळाल्या. या निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीची घसरगुंडी उडाली. काँग्रेस आणि मित्रपक्षांना केवळ ६० जागांवर समाधान मानावं लागलं.भाजप आणि एनडीएला २०१४ मध्ये इतकं प्रचंड मोठं यश मिळेल, याची कल्पना कोणीही केलेली नव्हती.
सर्वेक्षण | एनडीए | यूपीए |
इंडिया टुडे-सिसेरो | २७२ | ११५ |
टाईम्स नाऊ-ओआरजी | २५७ | १३५ |
एबीपी-नेल्सन | २८१ | ९७ |
इंडिया टीव्ही-सी व्होटर | २८९ | १०१ |
सीएनएन-आयबीएन-सीएसडीएस | २७६ | ९७ |
एनडीटीव्ही-हंसा रिसर्च | २७९ | १०३ |
२०१९ मध्येही २०१४ चीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. एक्झिट पोल्सचे अंदाज पुन्हा चुकले भाजप आणि एनडीएनं ३५० चा टप्पा ओलांडला. एकट्या भाजपनं ३०० हून अधिक अधिक जागा जिंकल्या. याचा अंदाजही अनेकांना आला नव्हता.
सर्वेक्षण | एनडीए | यूपीए |
रिपब्लिक टीव्ही-सी व्होटर | २८७ | १२८ |
टाईम्स नाऊ-व्हीएमआर | ३०६ | १३२ |
न्यूज १८-आयपीएसओएस | ३३६ | ८२ |
एबीपी-नेल्सन | २७७ | १३० |
इंडिया टुडे-ऍक्सिस | ३३९-३६५ | ७७-१०८ |
टुडेज चाणक्य | ३५० | ९५ |
२००४, २००९ मध्येही चुकले एक्झिट पोल२००४ मध्ये एनडीएची सरशी होईल असे अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र यूपीएनं निवडणूक जिंकली आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यानंतरच्या २००९ लोकसभा निवडणुकीत यूपीएला एनडीएपेक्षा काहीच जागा जास्त मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र यूपीएनं सफाईदार विजय मिळवला होता.
सेफोलॉजी म्हणजे काय?निवडणूक निकालाच्या दिवसांमध्ये सेफोलॉजी शब्द वारंवार कानावर पडतो. टीव्हीवरील चर्चांमध्ये सेफोलॉजिस्ट विश्लेषण करताना दिसतात. सेफोलॉजी राजकीय विज्ञानाची एक शाखा आहे. निवडणुकीचं वैज्ञानिक विश्लेषण म्हणजे सेफोलॉजी. मतदानाशी संबंधित जुनी माहिती-आकडेवारी, पब्लिक ओपिनियन पोल, निवडणुकीचा खर्च याचा अभ्यास सेफोलॉजीत केला जातो.सेफोलॉजी म्हणजे विज्ञान नाही. सेफोलॉजी म्हणजे निवडणुकीचं वैज्ञानिक विश्लेषण. मतदानाचा पॅटर्न, मतदानाची टक्केवारी, त्यांचा प्रभाव याचा अभ्यास सेफोलॉजिस्ट करतात. सरकार स्थापन करण्यासाठी किती टक्के मतं आवश्यक असतात, कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचं विश्लेषण सेफॉलॉजिस्ट करतात.