नवी दिल्ली - बिहारमध्ये मंगळवारी दुसर्या टप्प्यातील मतदान झाले. आता निवडणुकीचा केवळ एकच टप्पा शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली. सभेला संबोधित करतान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये जंगलराज आणणाऱ्यांना 'भारत माता की जय' आणि 'जय श्रीराम' म्हणल्यास त्रास होतो. लोकांनी अशा व्यक्तींपासून सतर्क राहिलं पाहिजे आणि त्यांना योग्य उत्तर दिलं पाहिजे असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींनी बिहारच्या सहरसामध्ये सभा घेतली. "जे फक्त आपल्या घरासाठी जगतात, अशा जंगलराजचा इतिहास असलेल्यांपासून बिहारमधील जनतेनं सावध राहावं. बिहारमधील जनतेने 'भारत माता की जय' घोषणा देऊ नये, अशी जंगलराजवाल्यांची इच्छा आहे. काहींना तर 'भारत माता की जय' बोलल्यामुळे ताप येतो. आता भारत मातेचे विरोधक मत मागण्यासाठी एकजूट झाले आहेत. अशांना योग्य उत्तर द्या" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मोदींनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत, लोकल फॉर व्होकल आणि सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा देखील उल्लेख केला. "आज विक्रेते सुलभ कर्ज घेत आहेत. तसेच शेतकर्यांना पशुसंवर्धन आणि मत्स्य उत्पादकांना क्रेडिट कार्ड सुविधा दिली जात आहे. बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात असं उत्पादन होऊ शकतं ज्यामुळे जगात राज्याचं नाव होऊ शकेल. आता देशातील धान्यांचे पॅकेजिंग जूटच्या पोत्यात होईल. त्याचबरोबर साखरेच्या पॅकेजिंगमध्ये जूटला प्राधान्य मिळेल, याचा फायदा बिहारच्या जूट उत्पादनक शेतकऱ्यांना होईल असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आज लोकसभा, राज्यसभा मिळूनही काँग्रेसचे 100 खासदार नाहीत - मोदी
अररियामधल्या फारबिसगंजमध्ये भाषण करताना मोदींनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा समाचार घेतला. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. काँग्रेसच्या सध्यस्थितीवरून हेच दिसतंय, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. 'बिहारच्या जनतेनं डबल युवराजांना नाकारत पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राज्यात एनडीएचं सरकार येणार हे निश्चित आहे,' असं मोदी म्हणाले. 'आज संपूर्ण जगाला बिहारनं संदेश दिला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना बिहारी जनता उत्साहानं मतदानासाठी घराबाहेर पडली आहे. दुसऱ्या टप्प्यात सध्या बंपर मतदान सुरू आहे,' असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना संकटात निवडणूक घेणाऱ्या निवडणूक आयोगाचेही मोदींनी आभार मानले.
काँग्रेसवर मोदींचं टीकास्त्र
काँग्रेसनं देशाला खोटी स्वप्नं दाखवली. गरिबी हटवू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, वन रँक वन पेंशन लागू करू, अशी आश्वासनं काँग्रेसनं दिली. मात्र त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळेच आज काँग्रेसची अवस्था वाईट आहे. लोकसभा, राज्यसभेतली सदस्यांची संख्या एकत्र करूनही त्यांचे 100 खासदार होत नाहीत. अनेक राज्यांत तर त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये तर ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळेच कोणाची तरी मदत घेऊन ते अस्तित्व टिकवू पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.