Bihar Election 2020: उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमारांना लागणार लॉटरी?; जिंकले किंवा हरले तरीही राहणार मुख्यमंत्री

By प्रविण मरगळे | Published: October 6, 2020 04:18 PM2020-10-06T16:18:55+5:302020-10-06T16:45:08+5:30

Bihar Assembly Election 2020, JDU, BJP, NItish Kumar News: मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस महाआघाडीसह आरजेडी-जेडीयूशी युती करून निवडणूक लढली होती.

Bihar Election: Will Nitish Kumar be CM will remain even if he wins or loses like Uddhav Thackeray | Bihar Election 2020: उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमारांना लागणार लॉटरी?; जिंकले किंवा हरले तरीही राहणार मुख्यमंत्री

Bihar Election 2020: उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमारांना लागणार लॉटरी?; जिंकले किंवा हरले तरीही राहणार मुख्यमंत्री

Next
ठळक मुद्देजेडीयूला बिहार निवडणुकीत चांगली कामगिरी बजावण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमारांचा प्रयत्न जर परिस्थिती अनुकूल असेल तर भाजपा मुख्यमंत्रीपदाचा दावा करु शकेल महाराष्ट्र निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीप्रमाणेच बिहारमधील चित्र असू शकते

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहेत तशा राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. विशेषत: सत्ताधारी एनडीएमधून लोक जनशक्ती पार्टी वेगळे झाल्यानंतर संपूर्ण समीकरण बदलले आहे. जेडीयूच्या विरोधात एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आघाडी उघडून आता उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे, त्यामुळे पक्षाच्या अडचणी थोड्या वाढू शकतात.

त्याचबरोबर बदललेल्या परिस्थितीत आता जेडीयू आणि भाजपा राज्यात समसमान जागा लढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या भविष्यासाठी आगामी निवडणुकांचे निकाल अत्यंत महत्त्वाचे ठरतील बिहार निवडणुकांनंतर महाराष्ट्रासारखा सत्तासंघर्ष पाहायला मिळेल का? याचीच चर्चा सर्वत्र आहे. राजकीय विश्लेषकांनुसार, निवडणुकीनंतर बिहारमधील राजकारण बदललेलं दिसेल, एलजेपीने एनडीएशी संबंध तोडले आहेत त्यामुळे निकालानंतर अशी परिस्थिती निर्माण केली जाईल असं सांगण्यात येत आहे. जर परिस्थिती अनुकूल असेल तर भाजपा मुख्यमंत्रीपदाचा दावा करु शकेल हे नितीशकुमार यांना आधीच माहित आहे. त्यामुळेच  नितीशकुमार यांनी आधीच 'प्लॅन बी' तयार केला आहे. ही रणनीती अगदी महाराष्ट्र निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीप्रमाणेच असू शकते, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली होती अशीही चर्चा आहे.

सध्या नितीशकुमार यांचा प्रयत्न असा आहे की त्यांचा पक्ष बिहार निवडणुकीत चांगली कामगिरी बजावेल, यासाठी ते प्रत्येक जागेसाठी उमेदवार निवडण्यात रस घेत आहेत. यासह जेडीयूच्या जागा भाजपापेक्षा जास्त असाव्यात, अशी त्यांची रणनीती आहे. जर जेडीयूने ८० पेक्षा जास्त जागा मिळविल्या तर बदललेल्या परिस्थितीत पक्षाला अन्य पक्षांसह सरकार स्थापन करण्याचीही संधी मिळू शकते. या प्रमुख पक्ष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस २७ जागांवर विजय झाली होती.

काँग्रेसच्या कामगिरीवर सगळ्यांची नजर

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस महाआघाडीसह आरजेडी-जेडीयूशी युती करून निवडणूक लढली होती. त्यावेळी जेडीयू आणि आरजेडीने १०१-१०१ जागांसाठी उमेदवार उभे केले होते, त्यावेळी कॉंग्रेसने ४१ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यावेळी पक्षाने २७ जागा जिंकल्या. यावेळी महाआघाडीच्या जागावाटपामध्ये कॉंग्रेसला ७० जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे काँग्रेसची कामगिरी तशीच राहिली आणि यावेळी त्यांच्या जागा वाढल्यास नवीन राजकीय समीकरणे उदयास येतील. कदाचित जेडीयू हा पर्याय देखील स्वीकारेल कारण राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसते आणि नितीशकुमार यांच्याशी काँग्रेसचं वैरही नाही.

निवडणुकीनंतर बिहारमध्येही महाराष्ट्रासारखा सत्तासंघर्ष?

जेडीयूचं राजकारण भाजपालाही कळले आहे, त्यामुळे पक्षाला महाराष्ट्राची चूक पुन्हा करायची नाही. हेच कारण म्हणजे पक्षाचे दिग्गज नेते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचं नाव सातत्याने पुढे करत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र निवडणुकांच्या काळात असे नव्हते. त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविली, त्यामध्ये शिवसेना सतत मुख्यमंत्रिपदाची मागणी करत होती पण भाजपाने यावर कधीच सहमती दर्शविली नाही. निवडणुकीच्या निकालानंतर हा पेच निर्माण झाला आणि त्यानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या समर्थनाने सरकार स्थापन केले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राची ही परिस्थिती टाळण्यासाठी भाजपा आधीच पूर्ण दक्षता घेत आहे.

एलजेपीनं साथ सोडल्यानंतर भाजपाची खास रणनीती

बिहार निवडणुकीत भाजपाने एलजेपीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावावर मत मागू नये असा स्पष्ट संदेश एलजेपीला दिला आहे. बिहार निवडणुकीत कोणत्याही प्रकारे भाजपाचे नाव घेणार नाही असे एलजेपीला स्पष्टपणे सांगण्यात आल्याचं भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कारण बिहारमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. नुकतेच एलजेपीचे प्रमुख चिराग पासवान म्हणाले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना त्यांचा नेता मानतात, म्हणून ते त्यांच्या नावावर मते मागतील.

Web Title: Bihar Election: Will Nitish Kumar be CM will remain even if he wins or loses like Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.