मुंबई– काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना ब्रेकफास्टसाठी एकत्र आणलं. यावेळी भाजपाविरोधी १४ पक्ष राहुल गांधींच्या आमंत्रणावरून एकत्र जमले होते. त्यावेळी केंद्र सरकारविरोधी अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिवसेनाही सहभागी झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) या बैठकीसाठी गेले होते. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून चालतानाचा एक फोटो व्हायरल झाला. यावरून भाजपाने (BJP) शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे. "फटे लेकीन हटे नही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. "सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा केंद्र सरकार बद्दलचा द्वेष सहाजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय. मागील दोन वर्षात ठाकरे सरकारने 'फटे लेकीन हटे नही' चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहितीय.." असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
"औरंगाबादच नाव संभाजी नगर करणारच - फटे लेकीन हटे नही; कोविडमध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख देणार - फटे लेकीन हटे नही; MPSC च्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार - फटे लेकीन हटे नही; लॉकडाऊन काळातील वीजबील माफ करणार - फटे लेकीन हटे नही; जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचं कृत्य करणार - फटे लेकीन हटे नही; खरोखरच आपली 'फटे लेकीन हटे नही’'ची वृत्ती खुपच कौतुकास्पद आहे. आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्या दिल्लीच्या युवराजांना झाला असेल. म्हणूनच त्यांनी आपल्याला पाठीवर कौतुकाची थाप दिली" असा टोला देखील चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
राहुल गांधीसोबतच्या फोटोवर शिवसेनेचे खा. संजय राऊत पहिल्यांदाच बोलले; “हातातला हात आता...”
राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून चालतानाचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोबद्दल संजय राऊत म्हणाले की, शिवसेना-काँग्रेस महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहेत. आता फक्त हातातला हात खांद्यावर आला इतकचं आहे. खांद्यावर हात ठेवला त्यात वाईट काय? आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य करताना पक्ष जवळ येऊन चालत नाही तर मनही जवळ यावं लागतं असं राऊतांनी सांगितले. त्याचसोबत जर काही सकारात्मक पावलं पडत असतील तर लोकंही त्याचं स्वागत करतील. शिवसेनेला नेहमीच राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राजकारणात मानाचं स्थान आहे. राहुल गांधी आणि माझी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरेंचे अनेक निरोप त्यांना दिलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत. राज्यातील सरकार आपण चालवायचं यावरही ते ठाम असल्याचं संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले.