राळेगणसिद्धी – येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या अशी प्रमुख मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे, मात्र अण्णा हजारेंचे हे आंदोलन स्थगित करण्याचे प्रयत्न भाजपाच्या नेत्यांकडून सुरू झालेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली.
या भेटीनंतर भाजपा नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णांशी चर्चा केली आहे, अण्णांचे म्हणणं समजून घेतल्या आहेत, मागच्या काळात ज्या मागण्या मान्य झाल्या त्यावर कशा अंमलबजावणी होत आहे, त्याबद्दल सगळं समजून घेतलं आहे, या गोष्टी केंद्र सरकारकडे मांडून त्याबाबत काही निर्णय करून घ्यायचे आहेत, अण्णा हजारे ही केवळ व्यक्ती नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण आहे, ते स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढत असतात. अण्णा हजारेंचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागावेत आणि त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच पंतप्रधानांना पत्र पाठवली तरी उत्तर मिळत नाही यावर अण्णा नाराज आहेत असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला त्यावर फडणवीस म्हणाले की, मागच्या काळात सरकारकडून काही उत्तरं मिळालं नाही, परंतु अण्णा हजारे यांच्या पत्राला उत्तर इतरांप्रमाणे देता येत नाही, तर चर्चा करूनच उत्तर द्यावं लागतं असं मी अण्णांना सांगितले केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मला स्वत: सांगितले चर्चा करा, त्यांना योग्य ते उत्तर देऊ असं म्हणाले होते, मागच्यावेळी लोकपालाचा मुद्दा होता तेव्हा आमच्या समितीने ड्राफ्ट केला होता, मधल्या काळात आमचं सरकार गेले, आता नवीन सरकारसोबत ड्राफ्टबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अण्णा हजारे काय म्हणाले?
२०११ मध्ये मी उपोषणाला बसलो. त्यावेळी माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत पत्र पाठविले. त्याचे उत्तरही दिले जात नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांचे शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे व कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखविणार आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक पत्रे लिहिली. मात्र एकाही पत्राचे उत्तर अजूनही पंतप्रधान मोदी यांनी दिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत असा आरोप अण्णा हजारे यांनी केला.