मुंबई : आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) व्यक्त केले. यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात दंगलीवरून (Gujrat riots) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केले आहे. गुजरातमध्ये 2002 साली झालेली दंगल ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिअॅक्शन) होती, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. (BJP leader Chandrakant Patil comments on Gujrat riot)
बुधवारी मुंबईत चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले, त्यानंतर गुजरातमध्ये दंगल झाली. त्यामुळे ही एक रिअॅक्शन म्हणावी लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना राहुल गांधी यांच्या आणीबाणी ही एक चूक असल्याच्या कबुलीबद्दल विचारणा करण्यात आली. यावर, आता इतक्या वर्षांनी राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
गुजरात दंगल ही चूक होती, असे भाजपा म्हणणार का?नवाब मलिक यांचा सवालराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीदेखील गुजरात दंगलीवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. 'राहुल गांधींनी त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी केलेली चूक स्वीकारली. याआधी काँग्रेसनं दिल्लीत झालेल्या दंगलीबद्दलही माफी मागितली आहे. आता नरेंद्र मोदी आणि भाजपा गुजरात दंगल ही चूक होती, असं म्हणणार का?, मोदी आणि भाजपानं गुजरात दंगलीबद्दल देशाची माफी मागावी,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली.
काय म्हणाले राहुल गांधी?कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले. प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटले की, आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.
(आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात')