मदिरालयं सुरू केली, पण मंदिरं उघडत नाहीत; बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून ही अपेक्षा नाही- फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 02:53 AM2020-10-09T02:53:38+5:302020-10-09T06:47:50+5:30
फडणवीस म्हणाले की मदिरालयांची वेळ वाढवून देणारे सरकार मंदिरे मात्र एक तासही उघडायला तयार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नाही.
मुंबई : कोरोनाच्या काळातही भ्रष्टाचार करीत सुटलेल्या राज्य सरकारविरुद्ध अनेक पुरावे आमच्या हाती आले आहेत, लवकरच ते उघड करू. कोरोनाचा मुकाबला, मराठा आरक्षण अशा सगळ्या आघाड्यांवर सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. या सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून ते वठणीवर आणू, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते.
फडणवीस म्हणाले की मदिरालयांची वेळ वाढवून देणारे सरकार मंदिरे मात्र एक तासही उघडायला तयार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांच्या कार्यकाळात देव, देश अन् धर्माची काय अवस्था झाली आहे? लोकमान्य टिळक असते तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल केला असता. महाराष्ट्रात ‘बॅड गव्हर्नमेंट’ तर आहेच, पण ‘नो गव्हर्नमेंट’ अधिक आहे, सरकारच दिसत नाही. कोविड सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत. सरकारला जाब विचारला की लगेच मुख्यमंत्री, गृहमंत्री हे हा महाराष्ट्राचा अपमान असे म्हणतात. तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. सरकारची सध्याची कृतीच महाराष्ट्राचा अपमान करत आहे, असे फडणवीस यांनी सुनावले.
सरकारमध्ये डोळे मिटून भ्रष्टाचार सुरू आहे. कोरोनाच्या काळात आम्ही राजकारण केले नाही पण भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे हाती येताहेत, त्यावर योग्यवेळी बोलेल, असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, ही भाजपची भूमिका आहे. पण या सरकारला मराठा आरक्षणाबाबत चालढकल करायची आहे. मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष घडावा असे प्रयत्न दुर्दैवाने होत आहेत. आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये. -देवेंद्र फडणवीस