नाशिक- भाजप अंतर्गत संघर्षामुळे चुरशीच्या झालेल्या महापालिकेच्या नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रशांत दिवे यांनी बाजी मारली आहे. भाजपचे विशाल संगमनेरे आणि डॉ सीमा ताजने गैरहजर राहिल्याने दिवे यांनी विजय मिळवला. (BJP won two ward commitee, one lost due to internal issues in Nashik Municipal corporation.)
दरम्यान, पंचवटीत मच्छीन्द्र सानप आणि पूर्व प्रभाग समितीत डॉ दीपाली कुलकर्णी या दोन ठिकाणी भाजपने बिनविरोध बाजी मारली. सिडकोत शिवसेनेच्या सुवर्णा मटाले तर सातपूरला मनसेचे योगेश शेवरे यांनी भाजपच्या मदतीने बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले तर नाशिक पश्चिम मध्ये भाजपची खेळी अयशस्वी ठरल्याने काँग्रेसच्या वत्सला खैरे बिनविरोध निवडून आल्या.
आज सायंकाळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिकरोड प्रभाग समितीच्या निवडणुकीत समसमान मते असतानाही केवळ भाजपच्या गटबाजीचा फटका पक्षाला बसला. या प्रभागात भाजपकडून मीरा हंडागे आणि सुमन सातभाई यांनी अर्ज दाखल केले होते. पक्षाने मीरा हंडागे यांना उमेदवारी दिली होती. समसमान मतांमुळे चिठया फैसला करतील अशी शक्यता असताना भाजपचे दोन नगरसेवक गैरहजर असल्याने 9 विरूद्ध 11 मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला.
दरम्यान, पंचवटी प्रभागात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छीन्द्र सानप तसेच रुची कुंभारकर आणि पूनम सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपचे बहुमत असल्याने विरोधकांनी अर्ज दाखल केले नव्हते. मात्र भाजपच्या आजी माजी आमदारांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होती मात्र पक्षश्रेष्ठींनी सानप यांच्या पारड्यात वजन टाकल्याने मच्छीन्द्र सानप बिनविरोध विजयी झाले.
नाशिक पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेने साथ न दिल्याने भाजपचा हिरमोड झाला आणि पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या वत्सला खैरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या समितीत बहुमत नसल्याने भाजप उमेदवार योगेश खैरे यांची मदार मनसेच्या नगरसेविका ऍड वैशाली भोसले यांच्या मतावर होती. मात्र, खैरे आणि भोसले नातेसंबंध असून या पूर्वी ऍड भोसले यांना महाविकास आघाडीनेच मदत केली होती. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांचे दिर असलेले नगरसेवक योगेश हिरे यांना माघार घ्यावी लागली आणि वत्सला खैरे बिनविरोध निवडलेल्या गेल्या.
सिडको प्रभाग समितीत शिवसेनेचे वर्चस्व असल्याने तेथे सुवर्णा मटाले देखील बिनविरोध निवडून आल्या. त्यांना आव्हान देणाऱ्या छाया देवांग यांनी माघार घेतल्याने मटाले यांची सहज निवड झाली. सातपूर प्रभाग समितीत भाजप आणि मनसेची युती असल्याने मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी या प्रभागात माघार घेतली.