नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत आणि मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश विधानसभेच्या काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली होती. दरम्यान, या पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे.काँग्रेसचे नेते एस एस वर्मा म्हणाले की, मध्य प्रदेशमधील जनतेची देहबोली ही काँग्रेसच्या बाजूने होती. बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्या अर्थाने ही निवडणूक एकतर्फी होती. महाआघाडीचा बिहार आणि काँग्रेसचा मध्य प्रदेशमध्ये विजय निश्चित होता. मात्र भाजपाने ईव्हीएमचा गैरवापर केला, असा माझा संशय आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, विकसित देशांनी ईव्हीएमचा वापर थांबवला आहे. मात्र मग आम्ही का ईव्हीअम वापरतोय. याचा वापर थांबवता येणार नाही का? तसेच ज्या दिवशी देशातील निवडणुका बॅलेट पेपरच्या मदतीने घ्यायला सुरुवात होईल त्या दिवशी भाजपाला त्याची औकात समजेल, असे विधान एसएस वर्मा यांनी केले.
नुकत्याच आटोपलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ७४ जागा जिंकल्या होत्या. त्याच्याा जोरावर एनडीए १२५ जागा जिंकून निसटत्या बहुमताने सत्तेत आली. दुसरीकडे बिहारमध्ये ७० जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १९ जागाच जिंकता आल्या होत्या. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला भाजपाकडून पराभव पत्करावा लागला. २८ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला १९ तर काँग्रेसला ९ जागांवर समाधान मानावे लागले होते.