मुंबई – सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडल्यानंतर त्याला जशास तसे उत्तर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील असं शिवसेनेने भाजपाला अप्रत्यक्षरित्या म्हटलं होतं.
यावर आशिष शेलार यांनी ट्विट करुन म्हटलंय की, बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
तसेच मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना?
भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असा सवालही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे.
त्याचसोबत कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला "बिर्याणी" घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची "बिर्याणी" खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.
सामना अग्रलेखातून शिवसेनेची भाजपावर टीका
राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच म्हणजे मातीशी बेईमानीच आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये, असा टोला शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून भाजपाला लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून भाजपाचे नाव न घेता टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्टाचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे. पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती भारताची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.