"तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझं लाईटबिल तूच पाहा; पवारसाहेबांना बारमालकांची काळजी अन् मुख्यमंत्र्यांना..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:55 AM2021-05-13T11:55:58+5:302021-05-13T11:57:04+5:30
वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकारमध्ये पोलिसात वाझे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे असा टोला भाजपाने लगावला आहे.
मुंबई – राज्यात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात लॉकडाऊन सदृश्य कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कडक निर्बंध ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.(BJP Target CM Uddhav Thackeray & NCP Sharad Pawar)
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून म्हटलंय की, लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेच होते, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी!.. सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझं लाईटबिल तूच पाहा असा चिमटा त्यांनी सरकारला काढला आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारमालकांची काळजी घेतलीय, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकारमध्ये पोलिसात वाझे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे. सामान्य माणसा तूच तुझा वाली आहे असंही केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, @PawarSpeaks साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला @FarOutAkhtar लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 13, 2021
ठाकरे सरकारचा दावा
गेल्या महिनाभरापासून राज्यात लागू असलेले कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. एप्रिल महिन्यात ६८ हजारांपर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णवाढ घटून ४० हजारांपर्यंत आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या घटली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढावा अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली होती.