आघाडी सरकारला बूस्टर, संघभूमीत भाजपाची हार; ६ पैकी ४ जागा आघाडीला, भाजप एक अंकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 01:08 AM2020-12-05T01:08:38+5:302020-12-05T07:43:47+5:30
विधान परिषद निवडणूक; विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चार जागा पटकावून आघाडीने भाजपला धोबीपछाड दिली.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात दणदणीत विजय मिळाल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मिळालेला ‘बुस्टर डोस’ असल्याचे मानले जात आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयी जल्लोष केला.
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चार जागा पटकावून आघाडीने भाजपला धोबीपछाड दिली. नागपूरच्या संघभूमीत झालेल्या पराभवाने भाजप नेत्यांवर नामुष्की ओढावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दुकलीने योग्य उमेदवारांची निवड केली नाही, अशी चर्चा आता भाजपमध्ये सुरू झाली आहे. या संदर्भात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले. हा निकाल कालच लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस यांचे प्राबल्य असलेल्या नागपूरच्या पदवीधर मतदारसंघातील भाजपची मक्तेदारी तब्बल ५८ वर्षांनंतर मोडित निघाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांच्यावर १८ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते प्राप्त झाली. भाजपने विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी महापौर संदीप जोशी यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे समर्थक मानले जातात तर जोशी हे फडणवीसांचे. ऐनवेळचा हा बदल कार्यकर्त्यांना रुचलेला दिसत नाही. नागपूरच्या विजयाने काँग्रेस पक्षाला मात्र संजीवनी मिळाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तब्बल ६२ उमेदवार रिंगणात होते. मात्र प्रमुख लढत महाविकास आघाडीचे अरूण लाड व भारतीय जनता पक्षाचे संग्राम देशमुख यांच्यामध्येच होती. ही लढतही एकतर्फी झाल्याचे दिसून आले. लाड यांना देशमुख यांच्यापेक्षा पहिल्याच पसंती क्रमांकांच्या मतमोजणीत तब्बल ४८ हजार ८२४ मते मिळाली. पुणे हा देखील भाजपचा गड मानला जातो. गेली सुमारे तीस वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र भाजपला फाजील आत्मविश्वास नडला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्क्याने विजयश्री खेचून आणली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय आहे. या निकालाने मराठवाड्यात महाविकास आघाडी आणखी मजबूत झाली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या २४ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे ९९७२ मतांसह आघाडीवर आहेत. महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ७७९३ मते प्राप्त झाली असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत. अपक्ष उमेदवार शेखर भोयर हे महाआघाडीच्या उमेदवाराला कडवी झुंज देत आहेत. ७६२२ मतांसह ते तिसऱ्या स्थानी आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंती क्रमांकाची तब्बल १ लाख २२ हजार १४५ मते मिळवत, महाविकास आघाडीच्या अरुण गणपती लाड यांनी जोरदार विजय मिळवला. त्यांनी ४८ हजार ८२४ मतांनी भारतीय जनता पक्षाच्या संग्राम देशमुख यांचा सहज पराभव केला. पुण्यातील दोन्ही जागांवर झालेला पराभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिव्हारी लागणारा आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे जयंत आसगावकर यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. आसगावकर यांनी ३३ फेरीपर्यंत निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न केल्याने अखेर प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आसगावकर यांनी २५ हजार ९८५ मते घेतल्याने अखेर तब्बल ३६ तासानंतर विजय निश्चित झाला.