नवी मुंबई – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा संघटनांच्या विविध बैठका आणि आंदोलन होत आहे. आरक्षणाबाबत पुढची दिशा काय असावी यासाठी नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे दोघंही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र उदयनराजे या बैठकीला येऊ शकले नाहीत.
छत्रपती संभाजीराजे यांनी या राज्यस्तरीय बैठकीला हजेरी लावली, परंतु मुख्य व्यासपीठावर बसण्यास संभाजीराजेंनी नकार दिला, यावेळी संभाजीराजे म्हणाले की, छत्रपतींचा आदर, सन्मान राखत आपण या व्यासपीठावर दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. त्याबद्दल आभारी आहे, मी मोठा नाही तर छत्रपती घराणं मोठं आहे. मात्र हा शिष्टाचार ठेऊ नये, मी याठिकाणी येतो तो मराठा समाजाचा सेवक म्हणून येतो, ज्याठिकाणी मानपान ठेवायचं तिथे आम्ही पुढाऱ्यांकडून घेतो, परंतु मी सेवक म्हणून या बैठकीला आलो आहे. त्यामुळे माझीसुद्धा खुर्ची समाजासोबत खाली असावी असं त्यांनी सांगितले.
तसेच राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमाला गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितले, मी शेतकरी आहे, तुमचा सेवक आहे. मी तुमच्यातला एक आहे, तेव्हा शाहू महाराजांनी समाजाचा सेवक म्हणून काम केले अशी आठवणही छत्रपती खासदार संभाजीराजेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली.
छत्रपती उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ
छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी मुंबईत आज होणाऱ्या मराठा आरक्षण बैठकीकडे पाठ फिरवली. मुंबईची वाट न धरता ते थेट नाशिकला गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी ३ ऑक्टोबर रोजी पुण्यात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु याही बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती.
आता माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवनात बुधवारी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. महिनाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे. मराठा समाजाला मागास समाजाप्रमाणे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी २०१६ पासून संपूर्ण राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. तब्बल ५३ मोर्चे राज्यात काढण्यात आले. अत्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाजातील युवक-युवतींनी रस्त्यावर उतरून आपले प्रश्न मांडले.
नाशिकवरून परत आल्यानंतर मोठी घोषणा
उदयनराजे खासगी कामानिमित्त नाशिकला गेलेले आहेत. नाशिकवरून परतल्यानंतर ते साताऱ्यात होणाऱ्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीबाबतची मोठी घोषणा करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम हॉलमध्ये ही बैठक होणार असल्याची खात्रीशीर माहिती असून तारीख आणि वेळ उदयनराजे जाहीर करतील, असे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले.