Video: छत्रपती उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट; शिवसेनेला लगावला टोला
By प्रविण मरगळे | Published: February 7, 2021 11:10 AM2021-02-07T11:10:35+5:302021-02-07T11:13:24+5:30
यावेळी संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असे योगी आदित्यनाथ यांना उदयनराजेंनी सांगितले.
लखनौ – आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज नाव दिल्यामुळे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेऊन आभार मानले, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी केली. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुकही केले होते, तेव्हा उदयनराजेंनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद साधत लवकरच तुमची भेट घेणार असल्याचं सांगितले होते, त्यानंतर शनिवारी ही भेट घेण्यात आली.
याबाबत उदयनराजे यांनी फेसबुकवरून पोस्ट करत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला या उत्तर प्रदेशात स्थान नाही. म्हणूनच आम्ही आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असून या संग्रहालयच्या माध्यमातून मांडला जाणारा मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल. असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे मुख्यमंत्री निवासस्थानी केले.
आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.@myogiadityanathpic.twitter.com/mco2Neqknl
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 6, 2021
योगी आदित्यनाथांना राजमुद्रा दिली भेट
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल संग्रहालयला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली होती. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज या नात्याने राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजाची आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत. जानेवारी २०१६ मध्ये या संग्रहालयाचे भूमिपूजन झाले असून ताजमहालच्या गेटपासून अवघ्या दिड किमी अंतरावर हे संग्रहालय उभं राहणार आहे. सुमारे २०० कोटी रूपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यानां औरंगजेबने आग्रा येथे कैदेत ठेवले होते. पण शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे आग्राहून सुटका केली. याचा प्रेरणादायी या संग्रहालयात मांडला जाणार आहे.
मी शिवभक्त – योगी आदित्यनाथ
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले कि, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्सिम भक्त असून त्यांच्या स्वराजातून आजही आम्हाला मोठी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्यासारख्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास जगापुढे आणला पाहिजे. महाराजांचा गनिमी कावा साऱ्या जगाने गौरविलेला आहे. आजही अनेक देशात या तंत्रांचा वापर केला जातो. ही अभिमानाची बाब असल्याचे योगी यांनी सांगितले.
तसेच आतापर्यंत अनेक राजकिय पक्षानी आणि नेत्यानीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. मात्र तुमच्या सारख्या राजकिय नेत्यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या नावे संग्रहालय बनवून महाराजांच्या पराक्रमाचा मोठा गौरव केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास संपूर्ण जगापुढे आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या घराण्याच्या वतीने तुमचे आभार मानतो. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकिय पक्षानी आपलं राजकिय अस्तित्व निर्माण केलं. त्याच शिवसेनेला महाराजांच्या किर्तीला साजेसं असं स्मारक महाराष्ट्रात उभारता आलं नाही. मात्र उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. यावेळी संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असे योगी आदित्यनाथ यांना उदयनराजेंनी सांगितले.
दरम्यान, याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचा गौरव केला. तसेच सातारा आणि प्रतापगडाला भेट देण्याचे खास निमंत्रण दिले. आपण याआधी एकदाच सातारा येथे आल्याची आठवण सांगून लवकरच प्रतापगडाला भेट देण्याचे आश्वासन दिले. गडावरील भवानी मातेची पूजा करून अफझल खानाला याच मातीत गाडल्याचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्याचे आश्वासन योगी यांनी दिले.