सोलापूर – परतीच्य पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमिनीत पाणी शिरले, पूरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरं कोसळली, शेतकऱ्यांवर डोंगराएवढं संकट कोसळलं, यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीसोलापूरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दौऱ्यात काही शेतकऱ्यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वकाही हिरावून घेतलंय, सोलापूरच्या रामपूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती केवळ ३ हजार ८०० रुपयांचा चेक दिला आहे. लहान लेकरं उपाशी बसलेत, धान्य वाहून गेले आहे, ३-४ लाखांचे नुकसान झालंय, एवढा तरी चेक कशाला दिलाय? तुमचा चेक घेऊन जा अशा शब्दात शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या शेतात व घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. याच कालावधीत अतिवृष्टीने जिल्ह्यात १६ जणांचा बळी गेला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोहचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली.
काळजी करू नका, हे शेतकऱ्यांचे सरकार - मुख्यमंत्री
मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे.
तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू, केंद्राकडे मदत मागण्यास गैर काय? पंतप्रधानांनी फोन करून सांगितलं आहे, चिंता करू नये, आवश्यक मदत करणार असं आश्वासन दिलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे, त्यांनी काय बोलावं, मागावं यापेक्षा त्यांचे दु:ख ओळखून आम्ही त्यांना मदत करणार आहोत, बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावं मग पंतप्रधानही घराबाहेर पडतील, केंद्र सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशाचं सरकार नाही, राज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचं कर्तव्य आहे, पक्षपातीपणाने बघू नये. मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.