मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकारण ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. या भाजपा नेत्यांच्या टीकेलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्याचसोबत चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं आहे.
या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे. तसेच काही जणांकडून सध्या चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षावरुन महाराष्ट्राने चिनी कंपनीसोबत करार केल्याचा आरोप केला. त्यावर आता तुम्हाला चीन नको आहे पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि विरोधकांना विचारला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)
तर मुख्यमंत्री पदावरुनही भाजपाला चिमटा काढला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी या’साठी’च केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)
मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध झाला असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनासाठी ही मुलाखत घेतली आहे. येत्या २५ आणि २६ जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. यात शिवसेना राज्यभरात वाढवण्याचं स्वप्न कायम आहे या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. तसेच मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो असं सांगत त्यांनी आपल्या स्वभावात मुख्यमंत्री झाल्यानंतरही कुठेही बदल झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.