काँग्रेस हायकमांडकडून जी-२३ ला वेसण घालण्याची तयारी, गुलाम नबी आझादांबाबत घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:02 PM2021-03-23T15:02:39+5:302021-03-23T15:04:47+5:30
Ghulam Nabi Azad : काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे. दरम्यान, जी-२३ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाला वेसण घालण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस नेतृत्वाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी गुलाम नबी आझाद यांचा समावेश आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत केलेला नाही. मात्र जी-२३ च्या गटात असलेल्या नेत्यांपैकी मनीष तिवारी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या पुत्राला स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्या माध्यमातून या नेत्यांच्या गटामध्ये फूट पाडण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केली आहे. (Congress high command prepares to encircle G-23, takes big decision regarding Ghulam Nabi Azad)
गुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील प्रमुख नेते आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर होत असलेले काँग्रेसचे पतन रोखण्यासाठी काँग्रेसकडून संघटनात्मक सुधारणांची मागणी या गटाकडून करण्यात आली आहे. तसेच या गटातील नेत्यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्षनेतृत्वाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी २८ फेब्रुवारी रोजी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत भूपेंद्र हुड्डा, मनीष तिवारी, राज बब्बर, कपिल सिब्बल यांच्यासह काही नेत्यांनी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यानंतर गुलाम नबी आझाद आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटली ह्या जम्मू काश्मीरच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्याकडून जम्मू काश्मीरमधील गुलाम नबी आझाद यांचा प्रभाव कमी करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका सुरू आहेत.