नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल टनेलचे उद्घाटन केले आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत खोदण्यात आलेल्या अटल बोगद्यामुळे भारताची सीमेवरील शक्ती वाढेल, असे प्रतिपादन मोदींनी या बोगद्याचे उद्घाटन करताना केले. मोदींनी या बोगद्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोगद्यात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे हात उंचावून अभिवादन केले. मात्र, बोगद्यात कुणीही नसताना मोदींनी नेमकं अभिवादन कोणाला केलं? असा सवाल राजकीय नेत्यांसह अनेकांनी विचारला आहे. मोदींचा हात दाखवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनेकांनी निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील यावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल यांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) एक व्हिडीओ पोस्ट करून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. "पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल यांनी आपल्या भाषणाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. नरेंद्र मोदींवर विविध मुद्यांवरून व्हिडीओमध्ये त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
'रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?'
बोगद्यात कुणीही नसताना मोदींनी नेमकं अभिवादन कोणाला केलं? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात कोणाकडे पाहून नरेंद्र मोदी हात उंचावत होते. तेथे तर जनता उपस्थित नव्हती?. देशाला अनर्थतेच्या खाईत घेऊन जाणाऱ्या पंतप्रधानांच्या आरोग्यावर परिणाम तर झाला नाही ना? जनतेला पीएम मोदींच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी, विशेष म्हणजे यापूर्वीही अनेकदा आदरणीय महोदयांनी अनेकदा असं केलं आहे, असे ट्विट प्रकाश आंबडेकर यांनी केले आहे. आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
अटल बोगद्यामुळे भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती मिळेल असं मोदींनी सांगितलं आहे. तसेच सीमेवरील पायाभूत सुविधांत सुधारणा करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती. तथापि, हे प्रकल्प मार्गीच लागत नव्हते. अनेक प्रकल्प नियोजनाच्या पातळीवरच रखडले होते. काही प्रकल्प अर्ध्यावर लटकले होते. सीमा भागातील दळवळण व्यवस्थेचा मुद्दा थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. सीमेवर गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांना अशा प्रकल्पांमुळे रसद पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल असंही म्हटलं आहे. विरोधकांनी देशाच्या संरक्षण हिताकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप करून ते म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी या बोगद्याचे भूमिपूजन केले होते.
"सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय"
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय" असं म्हणत राहुल यांनी टीका केली. तसेच यासोबत एक व्हिडीओही ट्विट केला. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वृत्तवाहिन्यांशी बोलणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच "उत्तर प्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी अमानवीय प्रकार करतंय. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांशी भेटू दिलं. त्याचबरोबर त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाही. पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण आणि त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.