नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर घराणेशाहीचा आरोप झाला. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिनं बॉलिवूड माफिया आणि ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा ऐरणीवर आणला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १० पेक्षा अधिक जणांना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचं कनेक्शन आता उघड होऊ लागलं आहे. मात्र बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला.
याबाबत राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या की, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या.
त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या.
खासदार रवी किशन लोकसभेत काय म्हणाले?
एकीकडे सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळीच दिशी मिळाली असून ड्रग्ज तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला. देशात पाकिस्तान व चीनमधून नशिल्या पदार्थांची तस्करी होत आहे. देशातील तरुण पीढीला उदध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे सांगत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी रवि किशन यांनी केली आहे. बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्ज रॅकेटचा शिरकाव झाल्याचे सांगत, एनसीबीकडून तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले. मात्र, याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, असेही खासदार रवी किशन यांनी म्हटले.
बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन
रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स स्टोरीमध्ये सारा अली खानोबत बॉलिवूडमधील ४ मोठी नावे समोर आली आहेत. यांची नावे ड्रग्स कनेक्शनमध्ये जुळले आहेत. रियाने या तीन लोकांची नावे NCB ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
टाइम्स नाउकडे रिया चक्रवर्तीने दिलेल्या तीन नावांची माहिती आहे. एनसीबीसमोर रियाने जी नावे घेतली त्यात अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, एनसीबी यांच्या विरोधात पुरावे जमा करतील आणि त्यांना समन्स पाठवेल.