मुंबई – येत्या १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांना लस देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. राज्यातही १८ वर्षावरील लोकांना मोफत लसीकरण केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत म्हणून देऊ असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटीलने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
प्रतिक पाटीलने स्वत:च्या लसीचे पैसे आणि इतर ५ जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्डसाठी ४०० रुपये तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची किंमत ६०० रुपये इतकी आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नागरिकांना मोफत लस देण्याबाबतची घोषणा करण्यात आली. यासाठी राज्य सरकारवर ६५०० कोटींचा भार पडणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.
काय म्हणाले प्रतिक पाटील?
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यापाठोपाठ जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांनीही तरुणांना आवाहन केले आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावे. सध्याच्या या कठिण काळात राज्याला मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. राज्याप्रती माझी जबाबदारी म्हणून मी ही भूमिका घेत असल्याचं प्रतिक पाटील यांनी सांगितले.
सत्यजित तांबे यांनीही केलं आवाहन
महाराष्ट्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व तरुणांच्या वतीने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संपूर्ण महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. तसेच मी पैसे देण्यास सक्षम असलेल्या सर्वांना आवाहन करतो की, कृपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लसीची रक्कम दान करा. ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल असं आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.
कोविन एँपवर नोंदणी करा
१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे.