अहमदाबाद – संपूर्ण देश सध्या कोरोना महामारीनं त्रस्त आहे. कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. रुग्ण ऑक्सिजन, बेड्स उपलब्ध होत नसल्यानं दगावत आहेत. अशातच या कठीण काळातही सवंग लोकप्रियतेसाठी काही नेतेमंडळी मागे हटताना दिसत नाहीत. एकीकडे माणसं मृत्यूच्या दारात आहेत तर दुसरीकडे भाजपा नेते स्वत:ची लोकप्रियता वाढवण्यावर भर देत आहेत.
गुजरातमध्ये एका भाजपा नेत्याने ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चा फोटो लावून त्याचा पुरवठा सुरू केला आहे. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक या प्रकाराचा निषेध करत आहेत. अमरेली भाजपाचे माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं २५ बेड्सवालं कोविड सेंटर उभारलं. त्यात जिल्हा रुग्णालयाकडून पाठवलेले रुग्णांचे उपचार केले जातात.
माहितीनुसार, हिरा सोलंकी यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याच्या लोकप्रियतेसाठी ऑक्सिजन सिलेंडरवर त्यांचे पोस्टर्स छापले आहेत. भाजपा नेत्याच्या अशा कृत्यावर लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोविड सेंटर उभारून भाजपा नेत्याने चांगले काम केले परंतु ऑक्सिजन सिलेंडरवर फोटो छापून स्वत:चं प्रमोशन करणं म्हणजे संकटात संधीसाधूपणा करणं आहे ते नेत्यांना शोभत नाही असं लोकं म्हणत आहेत.
अलीकडेच भाजपा कार्यालयात सापडले होते रेमडेसिवीरचे डोस
संपूर्ण देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं धुमाकुळ घातला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या लसीचा तुटवडा भासत आहे. देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारनं केलेल्या दाव्यानुसार हे इंजेक्शन सध्या स्टॉकमध्ये नाही. मात्र अलीकडेच गुजरातच्या एका पक्ष कार्यालयात लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दावा केला होता की, भाजप कार्यालयात ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना संक्रमित लोकांच्या नातेवाईकांना दिलं जात होतं. यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. जर रेमडेसिविर स्टॉकमध्येच नाही तर भाजपच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात आली कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.