मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील इतर भागांसोबतच राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचे (Coronavirus in Mumbai) रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. मुंबईतील जवळपास नियंत्रणात आलेली कोरोनाची परिस्थिती आता बिघडू लागली आहे. त्यामुळे मुंबईत नियम अधिक कडक करण्याचे तसेच अंशत: लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले जात आहेत. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिघडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)हे सुट्टीवर गेले असून, ते ताडोबाची सफर करत असल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. (Risinig Corona patient in Mumbai While all this is happening Guardian minister Aditya Thackeray is in “Tadoba”?)
नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यात ते म्हणाले की, राज्यात आणि मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. आज १७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र हे सारे घडत असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून ताडोबाच्या सफरीवर असून, ते सुट्टीचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. मग आता मुंबईला वाचणवार कोण? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईतील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. धारावीसारख्या भागातही कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.