सुकृत करंदीकर पुणे : राज्यात सत्ता हाती असताना चहूबाजूने येणारा नेते-कार्यकर्त्यांचा ओघ सत्ता गेल्यानंतर त्याच वेगाने ओसरू लागला. काही ठिकाणी नेते राहिले पण कार्यकर्ते गायब झाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढत असल्याचे वरपांगी चित्र म्हणजे केवळ सत्तेमुळे आलेली सूज होती. प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रात पक्ष रुजवण्यासाठी आणखी बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्याचा साक्षात्कार पदवीधरच्या निवडणुकीच्या निकालाने भारतीय जनता पक्षाला घडवला.
‘पन्नाप्रमुख’, ‘प्रचार यंत्रणा’ वगैरेचा उभा केला जाणारा डोलारा प्रत्यक्षात पोकळ का असतो? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने झोकून उतरल्याखेरीज भाजपाला पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे का जाता येत नाही? संघाच्या मदतीशिवाय निवडणूक जिंकून देणारे कार्यकर्ते कुठून गोळा करायचे? याचेही उत्तर भाजपाला मिळवावे लागेल. केवळ आयात नेते-कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींकडून लादले जाणारे नेते यांच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवता येईल का याचाही विचार भाजपाला करावा लागेल.
सत्ताबळावर ‘इनकमिंग’चा प्रचंड ओघ भाजपाच्या दिशेने वाहू लागला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात जिथे भाजपा नावालाही नव्हता त्या भागात गेल्या सहा वर्षांमध्ये अनेक मातब्बर राजकीय घराणी आणि पुढारी भाजपाने पक्षात घेतले. यामुळे भाजपाचा प्रचंड विस्तार झाला. पण हा भास होता हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आले. राज्यात, केंद्रात सत्ता नसतानाही जो पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपाने जिंकला तो हातातून घालवण्याची नामुष्की भाजपावर ओढवली यामागे अरुण लाड यांच्या व्यक्तिगत कष्टांचा मोठा वाटा आहे. गेल्यावेळच्या पराभवानंतरही ज्या चिकाटीने मतदारसंघ बांधण्यासाठी लाड निमूटपणे प्रयत्न करत राहिले त्याचे फळ २०२० मध्ये त्यांना भरभरून मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकदिलाने दिलेल्या साथीमुळे अगदी सहजपणे प्रचंड म्हणाव्या अशा मताधिक्याने लाड यांनी भाजपावर मात केली. मतदानाची टक्केवारी आणि मिळालेली मते पाहता भाजपाला फाजील आत्मविश्वास नडल्याचे स्पष्ट झाले. ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्याची चूक पुन्हा एकदा भाजपाने केली.
विनोदी बोलण्याचा लौकीकऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्याची चूक पुन्हा एकदा भाजपाने केली. या पार्श्वभूमीवर ‘विनोदी बोलण्याचा लौकीक’ ही शरद पवार यांनी केलेली टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गांभीर्याने घ्यावी अशी आहे.
गेले अनेक दिवस काही वाचाळ सारखी बडबड करत होते. अशा वाचाळवीरांना या निवडणुकीत चपराक बसली आहे. पुणे, नागपूरमध्ये झालेला आमचा विजय पुरेसा बोलका आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सुशिक्षित मतदारांनीही आघाडी सरकारला पसंती दिली आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री
नागपूरचा जो मतदारसंघ गेली ५५ वर्ष कधीही काँग्रेसला मिळाला नव्हता, जो भाजप - संघाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाला. मित्रपक्षांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळेच हा आणि इतर विजय आम्ही संपादित करू शकलो. पुढील काळातही महाविकास आघाडी यश मिळवत राहील. - बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस व महसूलमंत्री
विधानपरिषद निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत २४ जिल्ह्यात भाजपची धूळधाण झाली आहे. ही महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्स्प्रेस आहे.- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
या निकालाचे विश्लेषण करुन त्यावर पक्षपातळीवर विचार-मंथन करू. तीन पक्ष एकत्र आल्याने आमचे अंदाज चुकले. एकेकटे लढले असते तर चित्र वेगळे राहिले असते. शिवाय, यावेळी पुणे मतदारसंघात तिसऱ्या उमेदवारांनी फारच कमी मते घेतली. त्याचाही फटका बसला. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
आम्हाला अतिआत्मविश्वास नडला का, उमेदवार निवडण्यात चूक झाली का ते पाहावे लागेल. पण आम्ही बेसावध राहिलो हे नक्की. एका निवडणुकीतून कोणाची पीछेहाट होत नसते. - सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री, भाजप
ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यूं हुआ?...ये ना पुछो! विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी. ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे बंद करावेत. - अनिल देशमुख, गृहमंत्री.
नागपुरातील महाविकास आघाडीचा विजय हा दीक्षाभूमीने संघभूमीवर मिळवलेला विजय आहे. दलित आणि बहुजन एकत्र आले तर काय चमत्कार घडू शकतो, त्याचे हे उदाहरण आहे. - नितीन राऊत, उर्जामंत्री
महाराष्ट्रात लोट्स ऑपरेशनच्या वल्गना केल्या जात होत्या. तीन चाकी सरकार म्हणून आम्हाला हिणवलं जात होतं. पण महाविकास आघाडीची ताकद या निवडणुकीत दिसून आली. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून ते पराभूत होतील. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी