नवी दिल्ली – १९६० च्या दशकात मराठी माणसांच्या हितासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेनं काळानुरुप पक्षीय राजकारणात बदल करत हिंदुत्वाची वाटचाल धरली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात यासारख्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उतरवणं सुरु केले. परंतु एक अपवाद वगळता शिवसेनेला कधी बाहेरच्या राज्यात यश आलं नाही.
दादरा-नगर हवेली लोकसभा जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा(Shivsena) राज्याबाहेरील पहिला खासदार निवडून आल्यानं सगळीकडे कौतुक होत आहे. हुकुमशाहीविरोधात हा विजय असून नव्या विकास पर्वाची सुरुवात होईल अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशात बाहुबली पवन पांडेय यांच्या रुपानं शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला होता.
१९९१ च्या दशकात उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेला यश मिळालं. अकबरपूर विधानसभा मतदारसंघातून बाहुबली पवन पांडेय आमदार झाले. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून पवन पांडेय त्यावेळी उत्तर प्रदेशात शिवसेनेचा सर्वाधिक वर्चस्व असलेलं चेहरा म्हणून पुढे आले. त्यावेळी पवन पांडेय यांच्या नेतृत्वात शिवसेनेने गोरखपूर, बलिया, मेरठ, वाराणसी, लखनऊ याठिकाणच्या स्थानिक निवडणुकीतही वर्चस्व दाखवून दिलं होतं. परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत पवन पांडेय निवडून आले नाहीत. या काळात मुख्यमंत्री असलेल्या मायावती यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील गुंडावर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
त्यानंतर बाहुबली पवन पांडेय मुंबईला पळून आले. उत्तर प्रदेशात शिवसेना विस्तारासाठी कुठलंही नेतृत्व राहिलं नाही. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं यश मिळवल्यानंतर दादरा नगर हवेली लोकसभा जागेवरील विजय दुसरी ऐतिहासिक नोंद आहे. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महिला खासदार लोकसभेत केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीचं लोकप्रतिनिधित्व करणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला परंतु कधीही दुसऱ्या राज्यात प्रचारासाठी गेले नाहीत. परंतु त्यांचे स्वप्न दुसऱ्या राज्यातही शिवसेनेचा विस्तार व्हावा असं होतं. ५५ वर्षापूर्वी १९६६ मध्ये शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात दिल्ली, गुजरात, कर्नाटक, जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवली होती. पण राज्याबाहेर शिवसेनेला विस्तार करता आला नाही. आता दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर शिवसेनेची राष्ट्रीय पक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा आणखी दृढ होणार आहे.