नवी दिल्ली – केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार मोहन डेलकर यांच्या संशयास्पद आत्महत्येने खळबळ माजली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी मोहन डेलकर यांच्या निधनानं रिक्त झालेल्या लोकसभा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यात शिवसेनेने मोहन डेलकर(Mohan Delkar) यांच्या पत्नी कलावती डेलकर यांना उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणली. सुरुवातीच्या मतमोजणीपासून कलावती डेलकर आघाडीवर आहेत. काँग्रेस-भाजपा उमेदवारापेक्षा कलावती डेलकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
भाजपाकडून या जागेवर महेश गावित(BJP Mahesh Gavit) यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसनं महेश धोडी यांना तिकीट दिलं. हे दोन्ही उमेदवार शिवसेना उमेदवाराच्या खूप मागे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेचा पहिला खासदार दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. याठिकाणी १९८९ पासून आजपर्यंत मोहन डेलकर हे लोकसभा निवडणुकीत जिंकत आले आहेत. ७ वेळा त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी कलावती डेलकर यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.
मोहन डेलकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊन शिवसेनेने भाजपा-काँग्रेसविरोधात दंड थोपटले. भाजपाने येथील आदिवासी चेहरा महेश गावित यांना तिकीट दिले होते. कलावती डेलकर(Kalavati Delkar) यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांचा मुलगा अभिनव डेलकर सांभाळत होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी दादरा-नगर येथे जाऊन जोरदार प्रचार केला होता. कलावती डेलकर मोठ्या फरकाने निवडून येतील असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तो प्रत्यक्षात येताना दिसत आहे.
मुंबईच्या हॉटेलमध्ये मिळाला होता मृतदेह
खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईच्या एका हॉटेलमध्ये सापडला होता. त्यानंतर या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती त्यात दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. डेलकर यांच्या पत्नी कलावती आणि मुलगा अभिनव यांनी सुसाईड नोटच्या सहाय्याने पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी SIT गठीत करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सध्या हा तपास सुरू आहे.
कोण होते मोहन डेलकर?
मोहन डेलकर हे दादरा-नगर हवेली मतदारसंघाचे खासदार होते. १९८९ मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९१, १९९६ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विजय मिळवला. १९९८, १९९९, २००४ मध्ये मोहन डेलकर हे भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत पुन्हा जिंकले. त्यानंतर काही काळांनी भाजपाला रामराम करत २००९ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी झाले. १० वर्षांनी म्हणजे २०१९ मध्ये काँग्रेसमधून राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी खासदारकी पटकावली.