राष्ट्रवादीतील प्रवेशाचे टायमिंग साधणार, एकनाथ खडसे उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:55 PM2020-10-22T20:55:53+5:302020-10-22T20:59:52+5:30
Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे टायमिंग साधून एकनाथ खडसे हे मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई- भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे टायमिंग साधून एकनाथ खडसे हे मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच भाजपाला सोडचिठ्ठी देताना देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करणारे खडसे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काल भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी खडसे यांनी आपल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला नेतृत्व नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्यासोबत १५ ते १६ माजी आमदार आहेत. काही आजी आमदारसुद्धा आहेत. मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांचा प्रवेशात अडचणी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं. माझा नेमका गुन्हा काय, पक्षातल्या इतर मंत्र्यांवरही आरोप झाले असताना केवळ माझाच राजीनामा का घेतला, मला वेगळी वागणूक का दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. भाजप-शिवसेनेचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. इतरांना मात्र क्लीन चीट देण्यात आल्या. इतरांना आणि मला वेगळा न्याय का, असा सवाल खडसेंनी विचारला. फौजदारी गुन्हे असलेल्या, इतर पक्षांमधून आलेल्यांना पाठिशी घालण्यात आलं. पण पक्षासाठी ४० वर्षे राबणाऱ्या नेत्यावर सातत्यानं अन्याय करण्यात आला, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांना लक्ष्य केलं.
माझ्यावर होत असलेल्या अन्यायाची व्यथा मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र कोणीही मला गांभीर्यानं घेतलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटलो. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून गाऱ्हाणं मांडलं. तुम्ही देवेंद्र यांना घेऊन या. आपण चर्चेतून मार्ग काढू असं सांगण्यात आलं. हा निरोप मी देवेंद्रजींना दिला. त्यावर पुढील आठवड्यात जाऊ. पुढील महिन्यात जाऊ, असं म्हणत त्यांनी ४ वर्षे घालवली,' असं खडसे यांनी सांगितलं.