नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे एक प्रतिनिधी मंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेते बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. कोविड -१९ च्या प्रोटोकॉलमुळे केवळ पाच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत, यासंदर्भातील माहिती सीताराम येचुरी यांनी माहिती दिली. उद्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा आणि डिएमकेचे टीकेएस एलनगोवन राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत असलेल्या तीन कृषी कायद्याच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार असून याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी 'भारत बंद'ची हाक दिली. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळला. तसेच, विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
दरम्यान, 'भारत बंद' आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी सात वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या ९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले असताना ही बैठक बोलाविली आहे. या बैठकीसाठी सिंधू, टिकरी आणि गाजीपूर बार्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना बोलविण्यात आले असून एकूण १३ नेते अमित शहा यांची भेट घेतील, असे सांगण्यात येत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, "मला फोन आला, गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही जाऊ आणि अन्य नेते सुद्धा बैठकीला येतील. त्यांनी सात वाजता बोलविले आहे."